मतमोजणीसाठी बंदोबस्तात वाढ

By admin | Published: May 14, 2014 01:19 AM2014-05-14T01:19:16+5:302014-05-14T01:19:16+5:30

रामवाडी गोदाम : मोबाईल, रेडिओला बंदी

Enhanced competition for counting | मतमोजणीसाठी बंदोबस्तात वाढ

मतमोजणीसाठी बंदोबस्तात वाढ

Next

सोलापूर : सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी १६ मे रोजी रामवाडी येथील ग्रीन गोदामावर होणार असल्याने परिसरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, मतमोजणीवेळी गोदामात प्रवेश देण्यात येणार्‍या शासकीय कर्मचारी व उमेदवार प्रतिनिधींना मोबाईल, रेडिओ, काडीपेटी, तंबाखू, शस्त्र आणि इतर घातक वस्तू नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. रामवाडी येथील ग्रीन गोदामात दोन्ही मतदारसंघातील मतपेट्या सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. १६ मे रोजी सकाळी ८ वा. जिल्हा निवडणूक व सहायक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत मतपेट्या फोडल्या जातील व मतमोजणीस प्रारंभ होईल. मतदान केंद्राकडे जाणार्‍या रस्त्यावर दोन ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. रामवाडी रेल्वे ओव्हरब्रीजच्या तळप्रवेशद्वारापासून पासधारकांनाच मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश करताना गोदामाच्या प्रवेशद्वारावर तपासणी केली जाणार आहे. उमेदवारांच्या समर्थकांना मोदी पोलीस चौकीजवळच रोखले जाणार आहे. विजयी मिरवणुकांना बंदी असून, तरीही जल्लोष करणार्‍यांवर लक्ष ठेवण्यासाठी खास पथक तयार करण्यात आले आहे. शहरात ६३ ठिकाणी फिक्स पॉर्इंट लावण्यात आले आहेत. याशिवाय ६ स्ट्रायकिंग पथक तयार ठेवण्यात आले आहेत. १८७ ठिकाणी कमांडोंचा बंदोबस्त राहणार असून, यासाठी १३ मिनीबस कार्यरत राहणार आहेत. १७ उमेदवारांच्या घरावरही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. याशिवाय बॉम्बशोधक, गुन्हे, दंगानियंत्रण अशी पथके फिरतीवर आहेत. निकालानंतर प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या बाबतीत प्रतिक्रिया उमटू नयेत, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे.

---------------------------

एक हजार पोलीस पोलीस उपायुक्त : ३, सहायक आयुक्त : ४, पोलीस निरीक्षक : २३, फौजदार : ५५, पोलीस शिपाई १०१२ इतका पोलीस बंदोबस्त राहणार आहे. जिल्ह्यातही दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून, अकलूज, माढा, माळशिरस, बार्शी येथे जादा बंदोबस्त नेमण्यात आला आहे.

Web Title: Enhanced competition for counting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.