पांडुरंगाच्या दर्शनाला खुशाल जावा पण रस्त्याच्या उजव्या बाजूनं चाला

By विलास जळकोटकर | Published: March 27, 2023 07:11 PM2023-03-27T19:11:05+5:302023-03-27T19:11:24+5:30

चैत्री वारीच्या निमित्ताने तमाम महाराष्ट्रातील वारकरी बांधव दिंड्यानिशी पंढरपूरकडे पायी चालत जातात.

Enjoy the view of Panduranga but walk on the right side of the road | पांडुरंगाच्या दर्शनाला खुशाल जावा पण रस्त्याच्या उजव्या बाजूनं चाला

पांडुरंगाच्या दर्शनाला खुशाल जावा पण रस्त्याच्या उजव्या बाजूनं चाला

googlenewsNext

सोलापूर : चैत्री वारीच्या निमित्ताने तमाम महाराष्ट्रातील वारकरी बांधव दिंड्यानिशी पंढरपूरकडे पायी चालत जातात. यंदा २८ मार्च ते ६ एप्रिल या काळात अनेक रस्त्यांवर हे चित्र दिसणार आहे. अंधाऱ्या रात्री अथवा दिवसा पाठिमागून येणाऱ्या वाहनांच्या धडकेमुळेअपघात होतात. म्हणून उजव्या बाजूने चालावे, यासाठी आरटीओ प्रशासनाकडून पथकांद्वारे सोमवारपासून प्रबोधन मोहीम सुरु करण्यात आली.

चैत्री वारीसाठी लाखो भाविक पंढरीत दाखल होतात. बरेच वारकरी हे पंढरपूरकडे पायी चालत येत असतात. बऱ्याचदा पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये भरधाव वाहने घुसून अपघात झाले आहेत. यामध्ये अनेकांना जीवही गमवावा लागलेला आहे. संध्याकाळी अंधार पडल्यानंतर व भल्या पहाटे वाहनचालकांना गर्दीचा अंदाज येत नाही. तसेच वारकऱ्यांनाही पाठीमागून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही.

यासाठी सोमवारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायुवेग पथक क्रमांक १ मधील मोटार वाहन निरीक्षक प्रदीप बनसोडे,शिरीष तांदळे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अक्षय जाधव, विद्यादेवी जाधव, कार्यालयीन वाहन चालक शिवाजी गायकवाड यांना वाहनांची तपासणी करताना वारीतील सर्वच भाविक रस्त्याच्या डाव्या बाजूने पायी जात असल्याचे त्यांना आढळून आले. त्यावेळी त्यांनी सर्व भाविकांना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालण्याबाबत मार्गदर्शन केले.

पाच वायुवेग पथकाची नियुक्ती

यासाठी जनजागरण मोहीम राबवण्यासाठी यापुढे वारकऱ्यांची यात्रा सुरक्षित व विना अपघात होण्यासाठी, जीवित हानी टाळण्यासाठी चैत्र वारी निमित्त उप प्रा परिवहन कार्यालयाच्या वतीने ५ वायुवेग पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या वायुवेग पथकामार्फत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना पहाटे तसेच संध्याकाळी अंधार पडल्यानंतर रस्त्याच्या उजव्या बाजूने चालण्यासाठीचे प्रबोधन करण्यात येणार आहे.

सर्व भाविकांना चैत्र वारी निमित्त रस्त्याच्या उजव्या बाजूने चालण्यासाठी पाच वायुवेग पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून उजव्या बाजूने चाला याबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी ज्या ठिकाणी फूटपाथ नाहीत त्या ठिकाणी त्यांनी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे.
- अर्चना गायकवाड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

Web Title: Enjoy the view of Panduranga but walk on the right side of the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.