जिल्ह्यात मघा नक्षत्राचा सर्वदूर पाऊस, खरिपाला दिलासा : शेतकरी वर्ग सुखावला;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 02:52 PM2017-08-21T14:52:22+5:302017-08-21T14:52:41+5:30
सोलापूर दि २१ : अनेक दिवसांनंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने मघा नक्षत्रात शनिवारी सायंकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. शनिवारी सायंकाळपासून सुरु झालेल्या या पावसाची रिपरिप रविवारी सकाळपर्यंत सुरुच होती. मघा नक्षत्राच्या पावसाने शेतकºयांसह खरिपाला दिलासा दिला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत बसलेला बळीराजा या पावसाने सुखावला आहे. सोलापूर शहरातही मघा नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २१ : अनेक दिवसांनंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने मघा नक्षत्रात शनिवारी सायंकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. शनिवारी सायंकाळपासून सुरु झालेल्या या पावसाची रिपरिप रविवारी सकाळपर्यंत सुरुच होती. मघा नक्षत्राच्या पावसाने शेतकºयांसह खरिपाला दिलासा दिला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत बसलेला बळीराजा या पावसाने सुखावला आहे. सोलापूर शहरातही मघा नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली.
जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला, करमाळा, बार्शी, माढा, मोहोळ, अक्कलकोट, उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात मघा नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली आहे. भिज पाऊस म्हणून मघाने लावलेल्या हजेरीने शेतकºयांच्या चेहºयावर कमी प्रमाणात का होईना आनंद दिसत आहे. जूनच्या पहिल्या सप्ताहानंतर पडलेल्या पावसाने दडी मारली. पाऊस थांबल्याने गावागावांमधील विहिरी आटू लागल्या होत्या तर हातातोंडाला आलेली पिके माना टाकू लागल्या होत्या. या पावसाने नाले, ओढे, विहिरीत पाणी आले असून, खरीप पिकांना तूर्त तरी जीवदान मिळाले आहे.
-----------------
सांगोल्यात सर्वत्र संततधार
सांगोला : ‘अखेर’ मघा नक्षत्र पावले असून, शनिवारी मध्यरात्रीपासून सांगोला शहर व तालुक्यात पावसाची संततधार सुरू होती़ या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा तर मिळालाच पण रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. १२ तासांहून अधिक झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. बैलपोळा सणाच्या पूर्वसंध्येला मघा नक्षत्राचा पाऊस पडल्यामुळे रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मघा नक्षत्र २८ आॅगस्टपर्यंत असल्याने या कालावधीत पर्जन्यवृष्टी होणार असल्याचे संकेत हवामान खात्याने वर्तवले आहे.
-----------------
मोहोळमध्ये शेतकरी आनंदी
मोहोळ : दीर्घ विश्रांतीनंतर तालुक्यात सर्वदूर पडलेल्या मघा नक्षत्राच्या पावसाने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. उडीद, मका, तूर, सोयाबीन आदी खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.
मृग नक्षत्राच्या दमदार सुरुवातीनंतर दोन वर्षांच्या दुष्काळाच्या झळा विसरायला लावल्या होत्या. त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी मशागती करून ठेवल्या होत्या. काहींनी खरीप पेरण्या केल्या तर काही शेतकºयांनी उसाची जोरदार तयारी केली होती. काही शेतकºयांनी कांद्याची रोपे टाकली आहेत. सध्या कांद्याचा चढता भाव लक्षात घेता कांद्याची जास्तीत जास्त लागवड होईल हा अंदाज करीत तसे नियोजन केले होते .
--------------
अक्कलकोटमध्ये २३ मि. मी. पाऊस
अक्कलकोट : शनिवारी रात्रीपासून अक्कलकोट शहर व तालुक्यात झालेल्या रिमझिम पावसाने बळीराजाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तडवळे मंडळात सर्वाधिक २३ मि़मी़ पावसाची तर करजगी मंडळात केवळ दोन मि़मी़ पावसाची नोंद झाली असून, रविवारी दिवसभर तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच होती.
जून महिन्यात वेळेवर पावसाचे आगमन झाल्याने खरीप पेरणी वेळेवर झाली अन् पिकेही जोमाने आली. मात्र त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके माना टाकू लागल्या. त्यामुळे या परिसरातील शेतकरी हवालदिल झाला होता. पेरणीनंतर गायब झालेल्या पावसामुळे शेतकºयांच्या हातून खरीप हंगाम निसटला असला तरी जनावरांच्या चारा-पाण्यासाठी पावसाची अत्यंत गरज होती.
अक्कलकोटला १४ मि़मी़, चपळगावला १३, वागदरीला १६ मि़मी़, किणीला १५, मैंदर्गीला १३, दुधनीला १४ मि़मी़, जेऊरला ७ , तडवळे मंडळात २३ मि़मी़ तर करजगी येथे दोन मि़मी़पावसाची नोंद झाली आहे. रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने बळीराजा सुखावला आहे. दरम्यान रब्बी हंगामासाठी मोठ्या पावसाची गरज असल्याचे शेतकºयांतून बोलले जात आहे.
--------------
माढा तालुक्यात वीजपुरवठा खंडित
माढा : शहर व परिसरात शनिवारी रात्रीपासून सुरु झालेली पावसाची रिपरिप रविवारी दिवसभर सुरु होती. माढा तालुक्यात सर्वदूर पाऊस पडला. शनिवारी पाऊस पडत असताना तालुक्यातील काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता.
यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
माढा शहर व परिसरातील शेतकरी पावसाची वाट पाहत बसले होते. शेतातील पिके पाण्याअभावी जळून चालले होते. शनिवार व रविवारी सरासरी २० तास पाऊस सुरु होता़ बैलपोळ्याच्या मुहूर्तावर पावसाने आगमन केल्याने शेतकरी सुखावला आहे.
जिल्ह्यात इतर भागातही संततधार पाऊस झाल्याचे वृत्त आहे.