तरुणाईच्या एन्ट्रीने गावपुढाऱ्यांची उडवली झोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:18 AM2021-01-14T04:18:50+5:302021-01-14T04:18:50+5:30
कुर्डूवाडी : कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक तरुण शिक्षण, नोकरी, व्यवसाय बंद झाल्याने गावी आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अनेक ...
कुर्डूवाडी : कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक तरुण शिक्षण, नोकरी, व्यवसाय बंद झाल्याने गावी आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अनेक तरुण गावीच स्थिरावले. त्यातच ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आहे. त्यामुळे या तरुणांच्या ग्रामपंचायत निवडणुकीतील एन्ट्रीने गावपुढाऱ्यांची झोपच उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
माढ्यात ग्रामपंचायत निवडणुकीतील हलगीच्या तालावरच्या प्रचारातील तोफा बुधवारी पाच वाजता थंडावल्या. उमेदवार मात्र आता आपल्या प्रभागातील मतदारांच्या गोपनीय भेटीगाठी सरसावले आहेत. रात्रीचा दिवस कसा करायचा, याची रणनिती आखू लागले आहेत.
माढ्यात ८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार होत्या. परंतु, त्यातील ८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात ७४ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. त्यातही मोडनिंब, अरण, बेंबळे, लऊळ, कुर्डू, उपळवाटे, उपळाई (बु), उपळाई (खु), मानेगाव, शिराळा (मा), भुताष्टे, बावी, वरवडे, सापटणे (टे), रिधोरे, वाकाव, उजनी (मा), व्होळे (खु), बारलोणी, अकुलगाव, परिते, उंदरगाव, माळेगाव यासारख्या मोठ्या गावांमध्ये निवडणूक चुरशीची होत आहे. अनेक गावांमध्ये गावपातळीवर एकमेकांच्या विरोधात असणाऱ्या दोन गटात निवडणुकीवरून भलतीच चुरस निर्माण झाली आहे. तर काही गावात आमने-सामने असणाऱ्या दोन्ही गटांपेक्षाही काही प्रभागातील अपक्ष उमेदवार हे मतदारातून ‘हायजॅक’ झाल्याचे दिसले. तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये यावेळची लढत ही पारंपरिक दोन गटातच होत आहे. काही गावात मात्र यावेळी सुशिक्षित युवकांनी चंग बांधल्याने मातब्बर गावपुढाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. येथील अनेक गावात तर काही उमेदवारांसाठी जवळचे नातेवाईकच अचानक घेतलेल्या उमेदवारीच्या भूमिकेमुळे धोक्याची घंटा देऊ लागले आहेत.
कोरोनाचा परिणाम निवडणूक प्रचारावर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील अनेक गावात मतदारांनीच स्वतःहून गावातील प्रचाराकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. ते या निवडणुकीचे आपल्याला काही देणे-घेणे नाही, असेच वागत शेतात सुगीची कामे करण्यात व्यस्त आहेत. शिवाय प्रशासनानेही सभेवर बंदी घातली होती. त्यामुळे कोठेही प्रचारसभा झाल्या नाहीत. मात्र, उमेदवारांनी गाठीभेटीवर भर देत कोरोना नियमांचे पालन करून प्रचार केला.