‘ईपीएफ’चा प्रश्नी यंंत्रमागधारकांनी घेतली केंद्रीय श्रममंत्र्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 02:46 PM2017-08-21T14:46:54+5:302017-08-21T14:47:03+5:30
सोलापूर दि २१ : यंत्रमाग कामगारांना लागू करण्यात आलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) संदर्भात यंत्रमागधारकांच्या मागणीवर अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल, असे केंद्रीय श्रममंत्री बंडारू दत्तात्रय यांनी रविवारी हैदराबाद येथे स्पष्ट केले.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २१ : यंत्रमाग कामगारांना लागू करण्यात आलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) संदर्भात यंत्रमागधारकांच्या मागणीवर अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल, असे केंद्रीय श्रममंत्री बंडारू दत्तात्रय यांनी हैदराबाद येथे स्पष्ट केले.
यंत्रमाग कामगारांना ईपीएफ लागू केल्याप्रकरणी यंत्रमागधारकांनी गेल्या चार दिवसांपासून बेमुदत बंद पुकारला आहे. हा आदेश मागे घेऊन संपूर्ण देशातील यंत्रमाग उद्योग वाचवावा या मागणीसाठी सोलापूरच्या यंत्रमागधारकांनी खा. शरद बनसोडे यांच्या माध्यमातून बंडारू दत्तात्रय यांची हैदराबादेत भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी वरील आश्वासन दिले. दत्तात्रय यांनी हा विषय केवळ सोलापूरपुरता नसून संपूर्ण देशातील यंत्रमाग कामगारांचा आहे. यावर तज्ज्ञ व्यक्तींना अभ्यासासाठी नेमून यावर निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यंत्रमागधारकांनी श्रममंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यंत्रमाग उद्योग हा मायक्रो (सूक्ष्म) इंडस्ट्रीत मोडतो. हा उद्योग ३० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात कामगारांवर अवलंबून आहे. कमी नफ्यावर चालणाºया या उद्योगात लेबर चार्जेसवर बोजा वाढल्यास मोठ्या प्रमाणावर आर्थिक परिणाम होतो. अशा आर्थिक अडचणीत असलेल्या उद्योगासाठी सेक्शन १६ नुसार विशेष अधिसूचना काढून ईपीएफचा आदेश रद्द करण्यात येऊ शकतो. अशी अधिसूचना केंद्राने काढून यंत्रमाग उद्योगाला जीवदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या भेटीप्रसंगी खा. शरद बनसोडे, यंत्रमागधारक संघाचे प्रेसिडेंट धर्मण्णा सादूल, अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, राजू राठी, श्रीनिवास दायमा, नागेश वल्याळ, मल्लिकार्जुन कमटम, रामचंद्र जन्नू आदी उपस्थित होते.
------------------------
आज बंदबाबत फैसला
केंद्रीय श्रममंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी ११ वाजता सोलापूर यंत्रमागधारक संघात कारखानदारांची बैठक बोलाविण्यात आली आहे. यामध्ये बेमुदत बंद सुरू ठेवायचा की मागे घ्यायचा याविषयी निर्णय घेण्यात येणार असल्याचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी सांगितले.