काकापासून गर्भवती राहिलेल्या ‘त्या’ कोवळ्या बालिकेची अंधकार भविष्यातून सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 08:34 PM2022-12-26T20:34:45+5:302022-12-26T20:36:14+5:30
उच्च न्यायालयातून सर्व कागदपत्रे सादर करुन गर्भपाताची परवानगी मिळवली.
विलास जळकोटकर
सोलापूर : आजच्या चंगळवादी युगात नात्याला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना घडताहेत. अशाच एका १४ वर्षाच्या कोवळ्या जीवावर काकानेच अत्याचार केला (मावशीचा पती) अन् त्यातून तिची गर्भधारणा झाली. अशा अंधकारमय भविष्यातून बाहेर काढण्यासाठी सोलापुरातील विधी सेवा प्राधिकरणाने पुढाकार घेतला. उच्च न्यायालयातून सर्व कागदपत्रे सादर करुन गर्भपाताची परवानगी मिळवली. सोमवारी शासकीय रुग्णालयात तिचा गर्भपात करण्यात आला.
यातील १४ वर्षाची पिडित बालिकाच्या पोटात दुखत असल्याने ४ डिसेंबर रोजी तिला येथील विमा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. तिची तपासणी केल्यानंतर ती २४ आठवडे १ दिवसाची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. तिच्या पालकांनी याबद्दल विचारणा केली असता मावशीच्या नवऱ्यानेच (काका) तिच्यावर अत्याचार केल्याचे तिने सांगितले. या प्रकरणात पिडितेच्या वडिलांनी आरोपीविरुद्ध भा. दं. वि. ३७६ तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमान्वये फिर्याद दिली होती.
पिडितेचे वय पाहता तिचा गर्भपात करणे आवश्यक होते. त्यामुळे पालकांनी डॉक्टरांकडे विनंती केली. मात्र डॉक्टरांनी ती २५ आठवड्याची गर्भवती असल्याने न्यायालयाच्या परवानगीची गरज असल्याचे सांगण्यात आले.
भेदरलेले पिडितेच्या कुटुंबाने १४ डिसेंबर २२ रोजी सोलापूरच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे धाव घेतली. विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव नरेंद्र जोशी यांनी या कुटुंबाला दिलासा दिला. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे प्राधिकरणाचे रिटेनर लाॅयर देवीयानी किणगी यांनी उच्च न्यायालय विधी सेवा समिती मुंबई यांच्याकडे पिडितेची सर्व वैद्यकीय कागदपत्रे, पोलिसात दिलेली फिर्याद व गर्भपातासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे पाठवण्यात आली. पिडितेला आवश्यक असणारी सर्व कायदेशीर मदत मोफत देण्यात आली.
अन् गर्भपाताची मिळाली परवानगी
उच्च न्यायालयात उच्च न्यायालय विधी सेवा समिती मुंबई मार्फत याचिका १५७४७/ २०२२ दाखल केली. या याचिकेवर सुनावणी होऊन २४ डिसेंबर रोजी पिडितेच्या गर्भपातास परवानगी देण्यात आली.
विधी सेवाच्या प्रयत्नास आलं यश
आता पुढची कार्यवाही म्हणून पीडितेला सोमवारी (२६डिसेंबर) रोजी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिचा यशस्वी गर्भपात करण्यात आला. पिडितेचे वय पाहता तिला पुढच्या अंधकारमय भविष्यापासून वाचवण्यात यश आले.