२५ दिवसांनंतरही वैरागमधील तीन भागांचा पाणीपुरवठा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:15 AM2021-07-03T04:15:34+5:302021-07-03T04:15:34+5:30
वैराग : २५ दिवसांपूर्वी फुटलेली पाइपलाइन दुरुस्त करण्याकडे नगरपंचायत आणि संबंधित ठेकेदाराकडून दुर्लक्ष झाल्याने वैराग परिसरात मोहोळ चौक, छत्रपती ...
वैराग : २५ दिवसांपूर्वी फुटलेली पाइपलाइन दुरुस्त करण्याकडे नगरपंचायत आणि संबंधित ठेकेदाराकडून दुर्लक्ष झाल्याने वैराग परिसरात मोहोळ चौक, छत्रपती संभाजीराजे चौक व खंडोबा वेस या भागांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. या भागातील नागरिकांना २५ दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नाही. तत्काळ पाणीपुरवठा सुरू करा अन्यथा नगरपंचायतवर मोर्चा काढू, असा इशारा माजी सैनिक जगन्नाथ आदमाने व सदस्य वैजिनाथ आदमाने यांनी तहसीलदार शेरखाने व मुख्याधिकारी चरण कोल्हे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सोलापूर राज्य मार्गाचे रुंदीकरण, नूतनीकरण व भुयारी गटारीचे काम चालू आहे. त्यामुळे हे काम करताना या भागाला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन २५ दिवसांपूर्वी फुटली आहे. मात्र अद्यापपर्यंत ठेकेदार किंवा नगरपंचायत यांच्यापैकी कोणीच दखल घेतली नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे चौक, खंडोबा वेस, मोहोळ चौक या परिसरातील एक हजार नागरिकांना पाण्यापासून हाल सहन करावे लागत आहेत.
यावेळी माजी सैनिक जगन्नाथ आदमाने, ग्रामपंचायत सदस्य वैजनाथ आदमाने, मारुती पौळ, रंगनाथ गाटे, नाना शिखरे, अमरराजे निंबाळकर, भोसकर, आण्णा पौळ उपस्थित होते.
---
चार दिवसात कार्यवाहीच्या सूचना
पाणी प्रश्नाचा हा विषय गांभीर्याने घेत तहसीलदारांनी ठेकेदारांच्या संबंधिताला तसेच नगरपंचतीचे पाणीपुरवठा अधीक्षक राम जाधव यांना चार दिवसांत पाणी पुरवठा सुरुळीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. भुयारी गटारीमध्ये लोखंडी पाइपलाइन टाकून काम करण्याचे निर्देश दिले आहेत.
---
रस्ता सुरू होण्यापूर्वी ठेकेदारांनी पाइपलाइन टाकायचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नगरपंचायतीकडून हे काम थांबले. परंतु दोघांच्या वादात सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. पाइपलाइन होईपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा अन्यथा महिलांचा घागर मोर्चा काढू. तसेच जलशुद्धीकरण चालू करून स्वच्छ पाणीपुरवठा करावा.
- वैजिनाथ आदमाने, माजी ग्रामपंचायत सदस्य.
---
गटार खोदताना पाण्याची पाइपलाइन फुटून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. हे काम संबंधित ठेकेदारास व नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांस सांगून ताबडतोब पाइपलाइनची दुरुस्ती केली जाईल. पाणीपुरवठा सुरुळीत करावा.
- चरण कोल्हे, मुख्याधिकारी, नगरपंचायत, वैराग