आठवडा झाला तरीही पाच बैलगाड्यांसह शेतकऱ्यांचा मुक्काम कलेक्टर कचेरीतच
By विठ्ठल खेळगी | Updated: March 21, 2023 16:26 IST2023-03-21T16:25:48+5:302023-03-21T16:26:01+5:30
अद्यापही याबाबत तोडगा न निघाल्याने मागील आठवड्यापासून पाच बैलगाड्यांसह शेतकरी आजही कलेक्टर कचररीतच तळ ठोकून आहेत.

आठवडा झाला तरीही पाच बैलगाड्यांसह शेतकऱ्यांचा मुक्काम कलेक्टर कचेरीतच
सोलापूर - उतारावरील एमआयडीसीची नोंद कमी करण्याच्या मागणीसाठी मंद्रूपचे शेतकरी बैलगाडी मोर्चा घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मोर्चा मुंबईला घेऊन न जाता नोंदी रद्द होईपर्यंत कलेक्टर कचेरीतच मुक्काम ठोकण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला होता. मागील आठवड्यापासून पाच बैलगाड्यांसह शेतकरी आजही कलेक्टर कचेरीतच तळ ठोकून आहेत.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील नियोजित एमआयडीसीसाठी भूसंपादन केलेल्या सातबारा उताऱ्यावरील नोंद कमी करण्यासाठी मागील १७५ दिवसांपासून शेतकरी मंद्रूप ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलन केले. मात्र, कोणीच दखल न घेतल्याने वैतागलेले शेतकरी बैलगाडी मोर्चा घेऊन मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर धडकण्याचा निर्णय घेतला. दिनांक १४ मार्च रोजी हा मोर्चा मंद्रूप येथून निघाला होता. त्यानंतर १५ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा आल्यानंतर शेतकऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली. दोन दिवसात चर्चा करून निर्णय देऊ असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले. मात्र अद्यापही याबाबत तोडगा न निघाल्याने मागील आठवड्यापासून पाच बैलगाड्यांसह शेतकरी आजही कलेक्टर कचररीतच तळ ठोकून आहेत. जोपर्यंत निर्णय होत नाही. तोपर्यंत माघार हटणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
गुरुवारी मुंबईत होणार बैठक
मंद्रूपच्या शेतकऱ्यांच्या उतारावरील एमआयडीसीची नोंद कमी करण्यासंदर्भात गुरुवारी मुंबई येथे उच्चस्तरीय समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे. उतारावरील नोंदी कमी झाल्यास मंद्रूपकडे परत जाऊ, अन्यथा मोर्चा मुंबईचे दिशेने रवाना होईल, असे शेतकरी प्रवीण कुंभार यांनी सांगितले.