बायपास शस्त्रक्रियेनंतरही त्या अधिकाऱ्याने केला दुचाकीवरून दीड लाख किलोमीटरचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 10:38 AM2021-03-09T10:38:28+5:302021-03-09T10:39:27+5:30
धार्मिक अन् पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हवाई दलातील निवृत्त अधिकारी विश्वास कुलकर्णी यांचा प्रयत्न
सोलापूर : हवाई दलातील निवृत्त अधिकारी विश्वास गोविंद कुलकर्णी यांनी मोटारसायकलवरून दीड लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला असून, पुन्हा सोळा हजार किलोमीटर ५१ धाम फिरणार आहेत. धार्मिक अन् पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी ही भ्रमंती करीत असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
दरम्यान, मूळचे सोलापूरचे असलेले विश्वास कुलकर्णी हे दोन धाम पूर्ण करून सोलापुरात आले आहेत. तेव्हा शारीरिक शिक्षण संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दशरथ गुरव यांच्या हस्ते गोविंद कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष विठ्ठल कुंभार, सचिव प्रा. संतोष खेडे सहीने प्रशालेचे क्रीडाशिक्षक वीरेश अंगडी, शिवानंद सुतार उपस्थित होते. विश्वास कुलकर्णी १९९९ मध्ये एअरफोर्समधून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी टेलिकॉम कंपनीमध्ये २४ सेवा केली. दरम्यान, त्यांच्यावर बायपास (हृदयशस्त्रक्रिया) झाली. त्यांनी व त्यांच्या पत्नी निला कुलकर्णी यांनी कोकण ते कन्याकुमारी हा सागरीपट्टा दुचाकीने प्रवास केला.
संपूर्ण भारत प्रवास सुरू...
नेपाळ, भूतान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, चेन्नई, पंजाब, गुजरातमध्ये प्रदेश असा संपूर्ण भारत प्रवास केला आहे. सोलापुरात जुनी मिल मैदानाच्या बाजूला राहणारे व ७८ वर्षांचे विश्वास कुलकर्णी हे सोलापूर ते महूद (नांदेड) व तुळजापूर करीत सोलापुरात आले होते.