लॉकडाऊन काळातही बोलण्यासाठी धडपडताहेत कर्णबधिर बालके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 12:00 PM2020-05-18T12:00:29+5:302020-05-18T12:03:46+5:30
मुकेपणा निर्मूलन कार्यक्रम; बोलवाडी प्रकल्पात ऑनलाइन उपक्रम सुरू
मोहोळ : ‘बोलवाडी’ प्रकल्प आणि ‘प्रिसीजन’ यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेला ‘मुकेपणा निर्मूलन कार्यक्रम’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्याच्या संचारबंदी काळातही शेटफळ येथील बोलवाडीमध्ये ऑनलाइन सुरू आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अंगणवाडी कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील तब्बल २ लाख ८७ हजार बालकांची ‘ताटवाटी चाचणी’ घेऊन १४७ संशयास्पद कर्णबधिर बालके शोधली.
मोहोळ आणि माढा तालुक्यातील आतापर्यंत त्यातील २१ बालकांच्या कानाच्या ‘बेरा’ चाचण्या केल्या. या बालकांना श्रवणयंत्रे लावून प्रत्यक्ष बोलण्याचे प्रशिक्षण सुरू झाले; मात्र बालक व पालकांना प्रवास करता येत नसल्यामुळे अडचण निर्माण झाली होती. परंतु कोळेगाव येथील पालक प्रतिनिधी नामदेव मल्लाव यांनी या उपक्रमात पुढाकार घेऊन सर्व पालकांना आपल्या पाल्यांच्या भाषा बोलायला शिकवण्यासाठी प्रेरित केले.
जिल्ह्यातील इतर बालकांच्या कानाच्या तपासण्या सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुरू झाल्या होत्या. लॉकडाऊन परिस्थिती निर्माण झाल्याने ‘बेरा’ तपासणीचे काम सध्या स्थगित आहे. तरीही ठरलेल्या उद्दिष्टानुसार मोहोळ आणि माढा तालुक्यातील बेरा चाचणी झालेल्या बालकांना श्रवणयंत्रे लावली आहेत. लॉकडाऊनपूर्वी या बालकांच्या पालकांचीही कार्यशाळा घेतली आहे.
लॉकडाऊनमुळे पालकांना शेटफळ येथे येण्यास अडचणी येत होत्या; मात्र काही पालकांनी पुढाकार घेऊन सर्व पालकांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपवर पालक घरीच व्हिडीओ तयार करून एकमेकांना पाठवत आहेत. हे व्हिडीओ पाहून परस्परांना प्रोत्साहन देत आहेत तसेच दुरुस्त्या सुचवत आहेत.
याशिवाय बोलवाडी प्रकल्पाच्या अध्यक्ष जयप्रदा भांगे या देखील सर्व पालकांना त्यांच्या पाल्याला घरीच बोलायला कसे शिकवावे याबाबत मार्गदर्शन करत आहेत.
बालकांना मदतीसाठी यांची धडपड ...
- अनेक बालकांची श्रवणयंत्रे, श्रवण यंत्रांचे वायर्स, बॅटरी व इतर साधने नादुरुस्त झाल्याने व सोलापुरात प्रवेश बंदी असल्यामुळे अनंत अडचणी येत होत्या; मात्र बोलवाडी ग्रुपचे सोलापूर येथील सहकारी कृष्णात कोळी, अशोक पुजारी, डॉ. विनय चौधरी आणि शैलेश बच्चुवार यांनी सोलापूर येथून ही साधने हस्ते परहस्ते पालकांना पोहोच करून बालकांच्या ऐकण्याचा व बोलण्याचा मार्ग सोपा केला.
कर्णबधिर बालकांचे ऐकणे व बोलणे यात कधीही खंड पडू द्यायचा नाही म्हणून असा ऑनलाइन उपक्रम सुरू आहे. या अशा बालकांचे कान खºया अर्थाने तयार करण्यासाठी त्यांच्याशी सतत बोलत राहणे महत्त्वाचे आहे.
- जयप्रदा भांगे,
बोलवाडी प्रकल्प, शेटफळ