गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर पण सोलापुरातील मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा निघणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 08:49 PM2021-07-03T20:49:16+5:302021-07-03T20:50:02+5:30
खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांचा इशारा
सोलापूर : मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने केंद्राकडे तात्काळ प्रस्ताव पाठवावा. त्यासाठी राज्यशासनाने उद्यापासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचा एक दिवस वाढवावा पण मराठा आरक्षणाचा प्रश्न निकालात काढावा अशी मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केली आहे.
सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी केली.
याबाबत पुढे बोलताना खासदार नाईक- निंबाळकर म्हणाले, राज्यशासनाने मागासवर्गीय आयोगामार्फत तात्काळ सर्वेक्षण पुर्ण करुन त्याचा अहवाल राज्यपालांकडे पाठवावा. तो अहवाल राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे पाठवावा. त्यानंतर तो अहवाल पंतप्रधानांकडे आल्यानंतर केंद्रशासनाकडून मराठा आरक्षण मंजूर करुन घेण्याची जबाबदारी माझी आहे. मात्र ही प्रक्रिया पुर्ण न करता राज्यशासनाने थेट केंद्राकडे ही बोट दाखवणे बंद करावे असेही खासदार नाईक-निंबाळकर म्हणाले.
पोलीस मराठा आक्रोश मोर्चा दडपण्याचा प्रयत्न करतेय : खासदार नाईक-निंबाळकर
उद्या सोलापुरात होणाऱ्या मराठा आक्रोश मोर्चावेळी ग्रामीण भागातून येणाऱ्या मराठा तरुणांची अडवणूक किंवा दडपशाही केल्यास त्यामुळे होणाऱ्या उद्रेकास राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन जबाबदार असेल. आम्ही नेहमीप्रमाणे शांततेत मोर्चा काढणार आहोत त्यामुळे पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आक्रोश मोर्चात होणाऱ्या गर्दीबाबत विचारले असता खासदार नाईक-निंबाळकर म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यक्रमात हजारोंची गर्दी चालते मग आमच्या का नाही? आम्हीही सॅनिटायझर, मास्कचा वापर करणार आहोत. सर्व नियम आणि अटींना आधीन राहून आम्ही मोर्चा काढणार आहोत. सदरचा मोर्चा हा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आम्ही आत्ता हा मोर्चा काढत आहोत.
सोलापुरातील ठिणगीचा राज्यभर वनवा पसरणार : खासदार नाईक-निंबाळकर
मराठा आरक्षणासंदर्भात राज्यातील पहिला मराठा आक्रोश मोर्चाची सुरुवात ही सोलापुरातून होत आहे. या सोलापुरात पडलेल्या ठिणगीचा वनवा राज्यभर पसरेल. त्यामुळे सरकारने तात्काळ या मोर्चाची दखल घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा.