भीमेत पाणी सोडले तरी पंढरपूरला एक दिवस आड होणार पाणीपुरवठा
By काशिनाथ वाघमारे | Published: September 21, 2023 06:02 PM2023-09-21T18:02:24+5:302023-09-21T18:03:12+5:30
उजनी धरणात पाणीसाठा कमी असून शिल्लक पाणी पुढील पावसाळ्यापर्यंत पिण्यासाठी पुरावे, यासाठी भीमा नदीच्या पात्रात उजनीचे पाणी आले.
सोलापूर : उजनी धरणात पाणीसाठा कमी असून शिल्लक पाणी पुढील पावसाळ्यापर्यंत पिण्यासाठी पुरावे, यासाठी भीमा नदीच्या पात्रात उजनीचे पाणी आले. तरीही यापुढेही पंढरपूर शहरास एक दिवसा आडच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे. उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी अंबाबाई मंदिराच्या परिसरासमोरील भीमा नदीपात्रातील को. प. बंधाऱ्यात अडविण्यात येते. या बंधा-याची उंची नऊ मीटर आहे. या बंधा-यातील पाणीसाठ्यातून पंढरपूर, सांगोला शहर व ८१ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो.
सध्या पंढरपुरातील भीमा नदीपात्रातील पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा होतोय. परंतु, काही दिवसांतच त्या बंधा-यातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्याचबरोबर भीमा नदीपात्रातील सखोल भागात साठलेले पाणी जेसीबीच्या साहाय्याने चारी खोदून जॅकवेल परिसरात आणले जात आहे.
सोलापूर, पंढरपूर, सांगोला शहराच्या शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी उजनी धरणातून भीमा नदीपात्रात १७ सप्टेंबरपासून पाणी सोडण्यात आले आहे. सध्या उजनी धरणात पाणीसाठा कमी आहे. परिणामी पुढील वर्षभरात पाणीटंचाई जाणवणार आहे. यामुळे शिल्लक पाणी पुढील वर्षाच्या पावसाळ्यापर्यंत पुरावे यासाठी एक दिवसा आड पिण्यासाठी पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.