सोलापुरातील रंगभवन ते आंबेडकर चौक रस्त्याचे काम मुदत संपत आली तरीही ‘आणखी थांब’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 10:19 AM2018-11-22T10:19:47+5:302018-11-22T10:22:17+5:30
संथगती : झेडपी गेट, डफरीन चौक परिसरात वाहतुकीच्या कोंडीचा त्रास
सोलापूर : स्मार्ट सिटीचे काम अन् बारा महिने थांब, अशी गत सोलापूर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या अनेक कामांबाबत झाली आहे. रंगभवन ते डॉ. आंबेडकर चौक यादरम्यान साकारण्यात येत असलेल्या स्मार्ट रोडच्या कामाची मुदत दीड महिन्यात संपत असून, अद्याप अर्धेच काम झाल्याचे दिसते. यामुळे जि.प.समोरील रस्ता, डफरीन चौक, डॉ. आंबेडकर चौक या पर्यायी मार्गांवर वाहतुकीची कोंडी होत असून सोलापूरकर मेटाकुटीला आले आहेत.
स्मार्ट रोडच्या कामाचा कार्यारंभ आदेश १७ जुलै २०१७ रोजी पुण्याच्या निखिल कन्स्ट्रक्शनला देण्यात आला होता. रस्त्याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले. परंतु, त्यांची वेळ मिळाली नाही. मुख्यमंत्र्यांची वाट पाहण्यात दोन महिने गेले. अखेर सहकारमंत्री आणि पालकमंत्री यांच्या उपस्थितीत २३ सप्टेंबर २०१७ रोजी कामाचे उद्घाटन झाले.
नियमानुसार ठेकेदाराने १५ महिन्यांत या रस्त्याचे काम पूर्ण करणे अपेक्षित आहे. कामाला सुरुवात झाल्यानंतर पुन्हा जानेवारी २०१८ मध्ये गड्डा यात्रेच्या निमित्ताने काम बंद ठेवण्यात आले. सध्या रंगभवन ते मराठा मंदिर प्रवेशद्वार यादरम्यान डांबरीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या भागातील पाईपलाईन, भुयारी गटार ही कामे पूर्ण झाली आहेत. वाहनांसाठी अर्धवटपणे रस्ता खुला करण्यात आला आहे.
उड्डाणपूल घेणार बराच वेळ
- हरिभाई देवकरण प्रशालेसमोर भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. हे कामही अर्धवट आहे. रस्ता आणि उड्डाण पुलासाठी मोठी खोदाई करण्यात आली. त्यातून निघालेला मुरुम, मोठे दगड, सिमेंटचे पाईप असे बरेच साहित्य मैदानावरच पडून आहे. दीड महिन्यांवर गड्डा यात्रा आहे. तत्पूर्वी हे सर्व साहित्य हटविले जाणार की नाही, याबद्दलही शंका आहे. हरिभाई देवकरण प्रशाला ते आंबेडकर चौक यादरम्यान एकेरी मार्ग खुला आहे तर दुसºया मार्गावर खोदाई आणि दुरुस्तीची कामे सुरूच आहेत. हा मुख्य रस्ता बंद असल्याने डफरीन ते डॉ. आंबेडकर चौक आणि जिल्हा परिषद गेट या मार्गावर वाहतुकीची कोंडी होत असते.
कारणांची कमतरता नाही
- स्मार्ट सिटी कंपनीतील वरिष्ठ अधिकाºयांच्या मते, स्मार्ट रोडचे काम डिसेंबर २०१८ अखेर पूर्ण होईल. गड्डा यात्रेमुळे एक महिना काम थांबले. यानंतर पाणीपुरवठ्याचे पाईप बदलण्यासाठी बराच कालावधी लागला. उन्हाळ्यात एखादा पाईप फुटला असता तर शहरात ओरड झाली असती. त्यामुळे दक्षता घेऊन काम करावे लागले. भुयारी वायरिंगमधील वायर खरेदीचे काम मूळ प्रकल्पात समाविष्ट नव्हते. स्मार्ट सिटी कंपनीने वायरची खरेदी केली. यातून ४० लाख रुपयांची बचत झाली. पण, कामाला तीन महिने विलंब लागला. वाळू उपलब्ध नसल्याने उड्डाण पुलाच्या कामाला विलंब झाला.