Life Style; जिंदगी के साथ भी.. मॅचिंग के मास्क अलग अलग कलर में भी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 12:52 PM2020-05-28T12:52:04+5:302020-05-28T13:03:32+5:30
रंगीबेरंगी मास्क बाजारात : कापडी, सर्जिकल, डिझायनर आणि घरगुती बनवलेले
दीपक दुपारगुडे
सोलापूर : लॉकडाऊन संपल्यानंतरदेखील आता पुढचे अनेक दिवस घराबाहेर पडताना मास्क घातला जाणार आहे. मास्क हा आपल्या पोशाखाचाच एक भाग झाला आहे. हेच लक्षात घेऊन अनेकांनी डिझायनर, वेगवेगळ्या रंगाचे मास्क तयार करून विक्रीला ठेवले आहेत. नागरिक व ग्राहकही त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत. ड्रेसला मॅचिंग होणारे रंगीबेरंगी मास्क बाजारपेठेत उपलब्ध आहेत. त्यामुळे हटके मास्क घालण्याची फॅशनही सुरू झाली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोकांना मास्क वापरावे लागत आहेत, हे खरे असले तरी काही व्यक्ती त्यातही त्यांचा ड्रेसिंग सेन्स सांभाळत आपलं व्यक्तिमत्त्व, आवडीनिवडी प्रतिबिंबित होतील, असे मास्क लोक वापरत आहेत. कोरोनाच्या या कठीण काळातही सुंदर जगण्याचा प्रयत्न लोक करू लागले आहेत. फिजिकल डिस्टन्स पाळत पार पडलेल्या अनेक विवाह सोहळ्यात वधू-वरांना देखील त्यांच्या ड्रेसवर शोभेल असे डिझायनर मास्क परिधान करूनच विवाह सोहळा पार पाडत आहेत.
बाजारात उपलब्ध मास्क
- कापडी मास्क, सर्जिकल मास्क, डिझायनर मास्क आणि साधे घरगुती बनवलेले मास्क बाजारात दिसत आहेत. काही मास्कना तीन पदर आहेत. सर्वांत बाहेरचा पदर सुती, मध्ये फिल्टर आणि आतला मलमलपासून तयार केला आहे. अनेक मास्कच्या बाहेरच्या पदरावर आकर्षक नक्षी आहेत. लहान मुलांसाठी मासे, प्राणी, पक्षी, फुलं यांच्या नक्षीचे, ड्रॅक्युला, युनिकॉर्नचेही मास्क तयार केले असून ते चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. काहीजणांच्या मास्कला व्हॉल्व्ह असते, आतली हवा बाहेर जाते पण बाहेरील हवा आत येत नाही. याचा फायदा काय तर तुम्हाला फार घुसमटल्यासारखे होत नाही. शिवाय आतमधली उष्णता बाहेर फेकली गेल्याने गरम होत नाही.
मास्कचा वापर कसा करावा
- विविध प्रकारच्या मास्कची फॅशन जरी असली तरी मास्क हा कोरोनासारख्या जीवघेण्या आजारापासून बचाव करण्यासाठी आहे हे विसरून चालणार नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे मास्क घालताना सर्वप्रथम हात साबणाने वा सॅनिटायझरने धुवावेत. नंतर मास्कचा नाक व तोंडावर घट्ट बसेल व बाजूने हवा जाणार नाही याची काळजी घ्यावी. एकदा मास्क लावल्यानंतर मास्कला हात लावू नये.
कोरोना आजाराच्या अगोदर साधारण दिवसभरात १ ते २ मास्कची विक्री होत होती, कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढल्यापासून ७० टक्के मास्कची विक्री वाढली असून नागरिक मास्क सोबत हॅन्ड ग्लोज, सॅनिटायझर आणि फेस शिल्ड विकत घेत आहेत. रंगीबेरंगी कापडी मास्क लोकांना अधिक पसंतीस येत आहेत.
- सुनील उघाडे, मास्क विक्रेते.