भलेही बहुभाषिक सोलापुरी...तरीही आम्ही बोलतो मराठी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 11:50 AM2020-02-27T11:50:07+5:302020-02-27T11:53:14+5:30
मराठी भाषा दिन विशेष : आम्हालाही मायबोलीचा लळा
सोलापूर : आपले शहर तसे बहुभाषिक. मराठीसह कन्नड, तेलुगू, उर्दू या भाषांसोबत अनेक बोलीभाषाही बोलल्या जातात. या सर्वांमध्ये एक समान हृदय जोडणारा दुवा म्हणजे मराठी भाषा. आपली मातृभाषा कोणतीही असो. या सर्वांना मराठी भाषेने लळा लावला आहे. या भाषेला इतके प्रेम मिळाले आहे की, आता काहींच्या घरातही मराठीच बोलली जात आहे.
शिक्षण, व्यवहार यापुरतीच मराठी मर्यादित राहिली नसून, तिने सर्वांच्याच मनात आपुलकीचे स्थान निर्माण केले आहे. अशाच बहुभाषिक असणाºया सोलापुरातील मराठीचा लळा लागलेल्या मान्यवरांनी मराठी भाषा दिनानिमित्त‘लोकमत’शी संवाद साधला... तेव्हा त्यांच्या संवादातून मराठी भाषा आपली भाषा म्हणून त्यांनी नमूद केले.
सोलापुरात कन्नड, तेलुगु, बंजारा, मारवाडी, सिंधी भाषा बोलणारे अनेक जण गुण्यागोविंदाने राहत असताना त्यांची इथल्या मातीशी, इथल्या मराठी भाषेची चांगलीच नाळ जुळली आहे. गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाºया या शहरातील इतर बहुभाषिक मंडळी मराठी संस्कृती मात्र नेटाने जोपासली आहे. हाच विषय घेऊन ‘लोकमत’ने मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला बहुभाषिकांना आमंत्रित करुन त्यांचा सन्मान केला.
पती गुजराती तर पत्नी मराठी
- प्रिन्स पाटील हे गुजराती घरामधून आले आहेत. त्यांच्या पत्नी श्रुती पाटील या मराठी कुटुंबातील आहेत. एकाच घरात अशी गुजराती-मराठी संस्कृती पाहायला मिळते. प्रिन्स पाटील यांचे शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले. त्यांच्या घरी गुजराती भाषा बोलली जाते. गुजराती आणि मराठी या भाषा मला बहिणी वाटतात. या दोन्ही भाषांमध्ये बरेच साम्य आहे. त्यामुळे मराठी भाषा शिकायला अडचणी आल्या नाहीत. तसेच दहावीपर्यंत मराठी भाषा शिकायला असल्यामुळे मराठी आवडीची होती. जन्मच सोलापुरातील असल्यामुळे आम्ही मराठीच आहोत. याचा आम्हाला अभिमान असल्याचे प्रिन्स पाटील म्हणतात.
हिंदी भाषेबरोबरच मराठी भाषेला महत्त्व
- देशात हिंदी आणि मराठी भाषेची लिपी तशी सारखीच आहे. त्यामुळे हिंदी ही राष्ट्रभाषा असली तरी मराठी भाषाही त्याच पंक्तीत बसते. जो मराठी वाचतो, लिहितो अन् बोलतो तो हिंदी वाचतो, लिहितो अन् बोलतोही. त्यामुळे मी कन्नड भाषिक असलो तरी मराठी भाषा बोलण्याचा, लिहिण्याचा मला सार्थ अभिमान असल्याचे महाराष्ट्र वीरशैव युवक आघाडीचे शहराध्यक्ष राज पाटील यांनी सांगितले.
कन्नड संस्कृती तरी मराठीतून शिक्षण
- राजेश नीला आणि वैशाली नीला यांच्या घरी कन्नड बोलली जाते. या दोघा पती-पत्नींचे शिक्षण हे मराठी माध्यमातूनच झाले. त्यामुळे ते मूळचे कन्नड भाषिक असले तरी घरी कन्नडसोबत मराठी भाषा बोलतात. या दोन्ही भाषा बोलताना त्यांना कशल्याच अडचणी येत नाहीत. एखाद्या मराठी भाषिक घरात ज्या पद्धतीने मराठी बोलली जाते त्याच पद्धतीने त्यांच्या घरात मराठी बोलली जाते. एखाद्या अनोळखी व्यक्तीने त्यांना बोलताना पाहिले तर कुणीही ते मूळचे कन्नड भाषिक आहेत, असे म्हणू शकत नाहीत. त्यांच्या मुलावरही मराठी भाषेचे संस्कार त्यांनी केले आहेत.
तेलुगू जन्माने, मराठी मनाने
माझे शिक्षण व व्यवहाराची भाषा ही मराठीच आहे. घरीदेखील आम्ही मराठीच बोलत असतो. वडिलांचे मराठी खूप चांगले असल्याने मला मराठी भाषा शिकायला कोणतीही अडचण आली नाही. ज्ञाती संस्थेमध्ये देखील मराठी भाषेतूनच संवाद करण्यात येतो. मराठी भाषिक मित्र असल्याने या भाषेत वापरण्यात येणारे चपखल शब्द मला माहिती आहेत. या उलट मला तेलुगू भाषा बोलता येत असली तरी लिहिता येत नाही. माझा जन्म हा तेलुगू कुटुंबात झाला असला तरी मी मनाने मराठीच आहे.
- अमर सामल
मारवाडीइतकी गोड मराठी
लहानापासूनच मराठी भाषेचे संस्कार आमच्यावर झाले. त्यामुळे मराठी भाषाच ही माझी मातृभाषा आहे. मराठी भाषा ही मारवाडी भाषेइतकी किंवा थोडी जास्तच गोड आहे. मराठीची गोडी आधीपासूनच होती. महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर मराठी भाषिक लोक भेटतात. त्यावेळी त्यांच्यासोबत मराठी बोलण्यात जो अभिमान वाटतो तो इतर क्षणी वाटत नाही. मराठी भाषेतून दिले जाणारे संस्कार हे सर्वोत्तम असतात. यामुळेच मी माझ्या मुलांना मराठी माध्यमातून शिक्षण दिले.
- चंद्रकांत तापडिया
मराठी भाषा यायलाच हवी- अब्दुल शेख
- अब्दुल शेख आणि फरिदा शेख या पती-पत्नींचे शिक्षण हे उर्दू माध्यमातून झाले. त्यांची मातृभाषा उर्दू असल्याने घरीदेखील हीच भाषा बोलली जाते. या दोघांनी सोलापुरात आणि कोकणात अध्यापनाचे काम केले. मराठी भाषा चांगल्या पद्धतीने येत असल्याने राज्यात कुठेही काम करताना त्यांना अडचणी आल्या नाहीत. काम व शिक्षणामुळे मराठी भाषा अधिक जवळची झाली. मित्रांसोबत गप्पा मारताना मराठीच अधिक भावते. शाळेसंबंधी कार्यालयीन काम असो किंवा एखादा सामाजिक उपक्रम असो मराठी उपयोगी पडतेच. आपली मातृभाषा कोणतीही असो मराठी यायलाच हवी, असे त्यांचे मत आहे.