‘दक्षिण’मध्ये घडामोडी; दवाखान्यात उपचार घेणाºया शेळकेंना भेटून देशमुखांनी केली विचारपूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 12:15 PM2019-10-01T12:15:36+5:302019-10-01T12:17:53+5:30
बाबा मिस्त्रीच्या उमेदवारीनंतर राजकीय घडामोंडींना आला वेग
सोलापूर : सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाची उमेदवारी बाबा मिस्त्री यांना जाहीर झाली, त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. उमेदवारीने नाराज झालेले बाळासाहेब शेळके रुग्णालयात दाखल झाले तर सहकारमंत्री सुभाष देशमुख थेट सांगलीहून त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले.
गेल्या दोन महिन्यांपासून सोलापूर दक्षिण विधानसभेची उमेदवारी कोण घेणार यावर काँग्रेस पक्षात चर्चा सुरू होती. पाच वर्षांपूर्वी या उमेदवारीसाठी रस्सीखेच करणारे नेते यंदा ही बला माझ्या गळ्यात पडते की काय या विचारातून स्वत:ला काँग्रेसपासून दूर ठेवत होते. त्यापैकीच काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके हे देखील होते. रविवारी सायंकाळी बाबा मिस्त्री यांचे नाव काँग्रेसच्या पहिल्या यादीत जाहीर होताच अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला. याच दरम्यान बाळासाहेब शेळके उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले
शेळके यांना अतिदक्षता विभागात दाखल केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी रुग्णालयात भेटण्यासाठी रीघ लावली. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनाही ही माहिती मिळाली. सकाळी ते सांगली जिल्ह्याच्या दौºयावर गेले होते. सायंकाळी लगबगीने परत आले आणि त्यांनी थेट रुग्णालय गाठले. बाळासाहेब शेळके यांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, शेळके यांनीही नुकतीच एंजिओप्लास्टी झाल्याने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना शुभेच्छा देत निवडणुकीत धावपळ करू नका थोडी तब्येतीची काळजी घ्या, असा प्रेमळ सल्ला दिला. या भेटीप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय संचालक अविनाश महागावकर, सोलापूर बाजार समितीचे संचालक श्रीमंत बंडगर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस हणमंत कुलकर्णी, पं. स. सदस्य एम. डी. कमळे आदींची उपस्थिती होती.
...अन् कानात कुजबुजले बापू
- सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांनी परस्परांना तब्येतीची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या; मात्र रुग्णालयातून बाहेर पडताना देशमुखांनी शेळकेंच्या कानात काहीतरी कुजबुज केली त्यावर शेळके दिलखुलास हसले आणि म्हणाले नंतर पाहूया.