अखेर भाजप-शिवसेना समन्वयसमितीच्या बैठकीचा मुहूर्त ठरला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 01:05 PM2019-03-29T13:05:25+5:302019-03-29T13:08:34+5:30
नगरसेवकांची नाराजी : महायुतीतील घटक पक्षांना डावलून होतोय प्रचार
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातील प्रचाराच्या नियोजनासाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी समन्वय समितीची स्थापना केली आहे. पण या समितीच्या बैठकीला शनिवारी मुहूर्त मिळाला आहे. भाजपचे नेते शिवसेना, रासप, रिपाइं या घटक पक्षांना वगळून विविध ठिकाणी बैठका घेत आहेत. त्याबद्दल नाराजी वाढत असून, या बैठकीत त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
महायुतीचा मेळावा नुकताच हेरीटेज गार्डनमध्ये झाला. या मेळाव्यानंतर समन्वय समिती स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये भाजपकडून सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भाजपचे ज्येष्ठ नेते रघुनाथ कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी तर शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख महेश कोठे, गणेश वानकर, जिल्हा सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, पुरुषोत्तम बरडे, शहराध्यक्ष हरिभाऊ चौगुले यांचा समावेश आहे.
या समन्वय समितीने एकत्र बैठक घेऊन महायुतीच्या प्रचार सभांचे नियोजन करावे, घटक पक्षांना सोबत घ्यावे, असे आदेश दोेन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांकडून देण्यात आले आहेत. पण सध्या शहर उत्तर आणि शहर मध्य या भागात होणाºया बैठकांना शिवसेनेसह एकाही घटक पक्षाला आमंत्रण देण्यात येत नसल्याचे शिवसेनेचे नगरसेवक सांगत आहेत. बुधवारी युवा सेनेची बैठक झाली. या बैठकीत काही पदाधिकाºयांनी नाराजी व्यक्त केली. शनिवारी होणाºया या बैठकीत या विषयावर चर्चा होणार आहे.
- भाजप आणि शिवसेनेच्या समन्वय समितीमध्ये एकाही महिला पदाधिकाºयाचा समावेश नाही. विशेष म्हणजे महापौर आणि उपमहापौर पदावर महिला विराजमान आहेत. भाजप नेत्यांनी या दोघींना समन्वय समितीत स्थान दिलेले नाही. शिवसेनेच्या नेत्यांनीही महिला आघाडीतील पदाधिकाºयांना दूर ठेवले आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल. एकदा लढतीचे चित्र स्पष्ट झाले की प्रचाराला वेग येईल. त्यामुळेच आम्ही बैठक घेतली नव्हती. पण शनिवारी होणाºया बैठकीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून कामांचे नियोजन होईल. कार्यकर्त्यांमध्येही समन्वय ठेवला जाईल.
- महेश कोठे, जिल्हाप्रमुख, शिवसेना.