कधी गंमत म्हणून तर कधी कधी धमकाविण्यासाठी करायचा पिंटू गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 02:20 PM2019-05-20T14:20:37+5:302019-05-20T14:22:58+5:30
रक्तरंजित घटनेने अक्कलकोट तालुक्यातील सीना-भीमाकाठ कलंकित
शंकर हिरतोट
दुधनी : अक्कलकोट तालुक्याच्या दक्षिण भागातून सीना आणि भीमा नदी वाहत आहे. या नदीतून वाळू उपसा करून कमी वेळ आणि कमी खर्चात बक्कळ पैसा कमाविण्याचा सोपा मार्ग या भागातील नागरिकांना सापडला आहे. यात तरुणाईचा मोठा सहभाग असून, पिंटूसारखे लोक बेकार तरुणांची टीम बनवून आपल्या गुन्हेगारी वृत्तीला मदत मिळवत असल्याने सीना-भीमाकाठ पुन्हा एकदा रक्तरंजीत बनत आहे. सरपंच पिंटू हा कॉलेज जीवनापासूनच गुन्हेगारी वृत्तीचा शिकार बनल्याचे गावकरी सांगतात. तो गावठी कट्टा अन् परवान्याची बंदूक घेऊनच कॉलेजला जायचा म्हणे. कधी गंमत म्हणून तर कधी कधी धमकाविण्यासाठी गोळीबारही करायचा, अशी चर्चा सध्या सुरू आहे.
ग्रामस्थ पिंटूविषयी बोलताना सांगतात, आज पिंटू सरपंच असला तरी तो पूर्वी सुशिक्षित बेरोजगार म्हणूनच गावात वावरायचा. सन २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत गोळीबाराची घटना घडली आणि सुशिक्षित बेरोजगार असलेला पिंटू वाळू माफिया झाला. तेव्हा झालेल्या खून प्रकरणात तो सुटला. त्यावेळी त्याची वाळू वाहतूक व उपशाचा व्यवसाय नव्हता. याचा गंधदेखील त्याला नव्हता. पण त्याच्या बोलण्यात सतत ‘हिरोगिरी’ करायची भाषा असायची. यातूनच तो शेजारील कर्नाटकाच्या शिरगूर भागातील नागरिकांकडून वाळू उपसा अन् वाहतुकीचे धडे घेतले. त्यात त्याला यश मिळत गेले. सांगलीपासून ते कर्नाटकातील कानाकोपरा, महाराष्ट्रभर त्याची वाळू चोर मार्गाने जाऊ लागली. त्यातून काही दिवसात तो सीना-भीमाकाठचा ‘दादा’ बनला आणि त्याची दादागिरी सुरू झाली. वाळूतून पैसा, पैशातून दादागिरी, दादागिरीतून सत्ता आणि सत्तेतून गुन्हेगारी वृत्ती वाढत गेली. पाहता पाहता त्याची दहशत गावासह अक्कलकोटच्या काही भागात सुरू झाली. याला तालुका पातळीवरील नेते आणि कर्नाटकातील बड्या नेत्यांबरोबरच मंत्र्यांचे पाठबळ मिळू लागले. यामुळे तो बेभान सुटला आणि त्याची गुन्हेगारी वृत्तीही वाढत गेली. त्याच्या तावडीतून सगे, सोयरे, नातेवाईक, वाळू चोरही सुटले नाहीत.
वाढलेले त्याचे प्रस्थ पाहून वाळू व्यावसायिक, नेत्यांची उठबस वाढू लागली. निवडणुकीत तो सरपंचही झाला. परिसरातील प्रत्येक कार्यक्रमात समाजसेवकाच्या भूमिकेत वावरणारा पिंटूने देणगी, दान देण्यासाठी कधीच हात आखडता घेतला नाही. यामुळे त्याची लोकप्रियता वाढली. दुसºया बाजूला त्याच्या दहशतीखाली लोक वावरू लागले. त्यातूनच त्याच्या डोक्यात गुन्हेगारी प्रवृत्तीची हवा भरली आणि त्याला विरोध करणाºयाचा तो येनकेन प्रकारे काटा काढत गेला.
दोन डझनावर गुन्हे अन् स्थानबद्धही
- वेगवेगळ्या प्रकरणात पिंटूवर महाराष्ट्रसह कर्नाटकात दोन डझनवर गुन्हे दाखल आहेत. कित्येक प्रकरणात तो जेलची हवाही खाऊन आला आहे. दोन किंवा चारपेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याने महाराष्ट्रातून त्याला स्थानबद्ध करून येरवडा जेलमध्ये टाकण्यात आले होते. बावीस ते पंचवीस दिवसातच तो येरवडा जेलमधून बाहेर पडला अन् पुन्हा त्याची दादागिरी सुरू झाली.
पिंटू समजूनच कर्नाटकात हल्ला
- वाळू व्यवसायामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या पिंटूला शत्रूने अनेकवेळा घेरण्याचा प्रयत्न केला. त्यात विरोधकांना मात्र यश मिळाले नाही. रेवत (कर्नाटक) येथे पिंटूचा वावर अधिक असल्याने विरोधकांनी पिंटू समजून एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याच्या गाडीचे नुकसान केले होते. यात एका बड्या नेत्याला जेलची हवा खावी लागली. पिंटू मात्र प्रत्येक प्रकरणातून सहीसलामत सुटत गेला, असे लोक नाव न सांगण्याच्या अटीवर हकीकत सांगत आहेत.