कोरोनाच्या लढ्यात सर्वांचे योगदान; पण अजूनही बेशिस्त लोक आहेत...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 12:58 PM2020-05-29T12:58:31+5:302020-05-29T13:03:11+5:30

सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त दिपक तावरे लिहितात ‘लोकमत’साठी...!

Everyone's contribution to Corona's fight; But there are still unruly people | कोरोनाच्या लढ्यात सर्वांचे योगदान; पण अजूनही बेशिस्त लोक आहेत...!

कोरोनाच्या लढ्यात सर्वांचे योगदान; पण अजूनही बेशिस्त लोक आहेत...!

Next
ठळक मुद्देपरप्रांतीय मजुरांच्या व्यवस्थेची जबाबदारी महापालिकेवरशहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता यात खंड पडू दिलेला नाहीसार्वजनिक शौचालयापासून रस्ते स्वच्छतेची कामे सुरू

१२ एप्रिल रोजी शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. या रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याचा रिपोर्ट आला होता. महापालिकेच्या यंत्रणेची त्या दिवसापासून सुरू झालेली धावपळ आजतागायत कायम आहे. पहिला रुग्ण दुकानदार होता. त्याला कोणापासून लागण झाली हे कळायला वेळ गेला. दुकानात येऊन गेलेल्या एकेक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आपल्या शहरात आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांमध्ये १२ किराणा दुकानदार, २५ हून अधिक आरोग्यसेवक, सरकारी कर्मचाºयांचा समावेश आहे. लॉकडाऊनच्या काळात या सर्वांना सेवा देण्याची परवानगी होती. बहुतांश दुकानदारांच्या दुकानात मोठी गर्दी असते. मेडिकल स्टाफने किती लोकांना सेवा दिली हे कळायला वेळ लागतो, परंतु आम्ही या प्रत्येकाच्या संपर्कातील जास्तीत जास्त लोकांना क्वारंटाइन केले. इतर शहरांमध्ये कोरोनाचे पहिले रुग्ण कोण होते हे तत्काळ लक्षात आले. त्यांच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करुन उपचार करण्यात आले. आपल्याकडे मात्र वेगळी परिस्थिती आहे.

शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. एकूण रुग्णांपैकी ८५ टक्के लोकांवर फारसे उपचार करावे लागले नाहीत. ते तत्काळ बरे झाले आहेत. ९ टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतांश रुग्ण हे ज्येष्ठ होते. त्यांना यापूर्वी उच्च रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर यासारखे आजार होते. गंभीर स्थितीत शेवटच्या क्षणी रुग्णालयात आले. या रुग्णांवर इतर ठिकाणी उपचार झाले नाहीत. खासगी रुग्णालयांच्या काही अडचणी होत्या. पण आता महापालिकेने शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी फिव्हर ओपीडी सुरू केल्या आहेत. सर्व आरोग्य केंद्रामध्ये तपासण्या सुरू आहेत. आरोग्य सेवकांना पीपीई किट दिले आहे. एप्रिल महिन्यात सर्वत्र पीपीई किट, थर्मल स्कॅनर व इतर साहित्याचा तुटवडा होता. प्रशासकीय सेवेत मी दिल्ली, मुंबई येथे अनेक वर्षे काम केले आहे. त्या संपर्कामुळे मी विविध शहरातून आवश्यक ते साहित्य तत्काळ मागवून घेतले. महापालिकेच्या आरोग्य विभागात आणखी कर्मचाºयांची भरती करुन घेतली.

मार्चपासून आम्ही विविध आघाड्यांवर लढतोय. परप्रांतीय मजुरांच्या व्यवस्थेची जबाबदारी महापालिकेवर होती. क्वारंटाईन सेंटर उभारणे,  प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षण, त्यासाठी आवश्यक तो कर्मचारी वर्ग जुळवणे अशी अनेक कामे सुरू होती. शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता यात खंड पडू दिलेला नाही. सार्वजनिक शौचालयापासून रस्ते स्वच्छतेची कामे सुरू आहेत. पावसाळ्यापूर्वी करायच्या कामांना गती दिली आहे. महापालिकेचे सर्व कर्मचारी जीवाची पर्वा न करता कामावर आहेत. महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर कामाचा ताण आहे. या ठिकाणी एकाचवेळी आरोग्य तपासणीसोबत परगावी जाण्याºया लोकांना आरोग्य प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ३५ हजारांहून अधिक लोकांना प्रमाणपत्र दिले आहे. निवारा केंद्रात थांबलेल्या सर्व लोकांना मूळ गावी सोडण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करुन घेतल्या आहेत.

या कामात महापौर, सर्व गटनेते, सर्व नगरसेवकांनी मोलाचे सहकार्य केले आहे. अनेक नगरसेवकांनी आपल्या भागात फिव्हर ओपीडी सुरू केल्या आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात आमचे नियमित दौरे सुरू आहेत. या दौºयांमध्ये नगरसेवकांकडून आवश्यक ती माहिती मिळते. त्यानुसार कार्यवाही केली जाते.
कोरोनाचा सामना करण्यात विविध घटकांचे योगदान महत्त्वाचे आहे. जे लोक ऐकत नाहीत. अजूनही बेशिस्त आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मास्क न वापरणे, अस्वच्छता ठेवणाºया लोकांवर कारवाई करावी लागत आहे. कोरोना हे जागतिक संकट आहे. त्या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक घटकाचे योगदान आवश्यक आहे. शहरवासीयांनी घाबरण्याचे कारण नाही. आपण यावर मात करणार आहोत.  फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क व ग्लोज वापरणे, अत्यावश्यक कामाखेरीज घराबाहेर न पडणे अशी काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. महापालिकेची सर्व यंत्रणा तुमच्या मदतीला आहे.

माझ्यापेक्षा शहराचे आरोग्य महत्त्वाचे
पहाटे साडेपाच-सहा वाजता मी उठतो. वॉकिंग करताना सर्व अधिकाºयांना फोन करुन नियमित कामे, प्रतिबंधित क्षेत्रातील कामांचा आढावा घ्यायला सुरुवात करतो. सकाळी दहा वाजेपर्यंत फोन व कामांचा आढावा घेतल्यानंतर कार्यालयात जातो. तिथून प्रतिबंधित क्षेत्रातील दौरे, महत्त्वाच्या शासकीय बैठका, नगरसेवकांसोबत आढावा बैठका, व्हिडिओ कान्फरन्सिंग सुरू होतात. हे सत्र रात्री अकरा ते बारापर्यंत सुरू असते. परवा शहरातील विविध आस्थापनांबाबत आदेश काढण्यासाठी पहाटे तीनपर्यंत कामकाज सुरू होते. माझा मुलगा लॉकडाऊनमुळे कॅनडात अडकून पडला आहे. पत्नी आणि लहान मुलगा इथे सोलापुरातच आहेत. कुटुंबातील लोक माझी धावपळ पाहत असतात. जेवणाच्या वेळेचा बºयाचदा गोंधळ असतो. रात्री उशिरापर्यंत काम करुनही अनेकदा झोप लागत नाही. माझ्या रुटीनमध्ये खूप बदल झालाय. माझ्या आरोग्यापेक्षा माझ्या सोलापूर शहराचे आरोग्य व्यवस्थित राहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे रुटीनमधील बदल मी स्वीकारला आहे. चहा घेणे बंद आहे. प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी आवळ्याचा ज्यूस घेतोय.

पाचवा लॉकडाऊन वेगळा असेल
पाचव्या लॉकडाऊनबाबत केंद्र सरकारकडून लवकरच निर्देश येणार आहेत. रेड झोन वगळून शहरांमधील व्यवहार सुरू होत आहेत. परवा व्यापाºयांचे शिष्टमंडळ भेटले. अनेक व्यावसायिकांकडून वेगवेगळ्या मागण्या होत आहेत. त्यावरही विचार सुरू आहे. चौथ्या लॉकडाऊनपेक्षा पाचवा लॉकडाऊन वेगळा असेल. काही महत्त्वाच्या गोष्टी सुरू होतील. पण लोकांनी स्वयंशिस्त राखणे महत्त्वाचे आहे. 

Web Title: Everyone's contribution to Corona's fight; But there are still unruly people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.