व्वा! वंदे भारत मध्ये सारं काही ऑटोमॅटिक; दार उघडण्यापूर्वीच स्थिरावतात स्टेप्स
By बाळकृष्ण दोड्डी | Published: February 3, 2023 01:52 PM2023-02-03T13:52:51+5:302023-02-03T13:53:04+5:30
सोलापूरचे लोको पायलट अर्थात ट्रेन चालक प्रशांत बिडे यांनी गुरुवारी वंदे भारत रेल्वेची चाचणी घेतली.
सोलापूर :
सोलापूरचे लोको पायलट अर्थात ट्रेन चालक प्रशांत बिडे यांनी गुरुवारी वंदे भारत रेल्वेची चाचणी घेतली. सोलापूर रेल्वे स्थानकावरून सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी वंदे भारत पुण्याकडे रवाना झाली. अवघ्या तीन तास वीस मिनिटांत त्यांनी पुणे स्थानकावर गाडी आणली. या ट्रेनमध्ये सारं काही ऑटोमॅटिक असून, दरवाजा उघडण्यापूर्वीच फलाटावर स्टेप्स स्थिरावतात. शिवाय प्रत्येक एक्झिक्यूटिव्ह सीटिंगला मोबाईल चार्जिंग पाॅइंटही आहे.
दहा फेब्रुवारी रोजी मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत दुपारी तीन वाजता उद्घाटन कार्यक्रम होणार आहे. या पार्श्वभूमीवर वंदे भारतची गुरुवारी चाचणी झाली. गुरुवारी पहाटे एक वाजून पंचवीस मिनिटांनी ही नवीन गाडी सोलापूर रेल्वे स्थानकावर आली. त्यानंतर सहा वाजून पाच मिनिटांनी प्लॅटफाॅर्म क्रमांक दोनवरून पुण्याकडे रवाना झाली आहे. पहिली चाचणी सोलापूर ते पुणे अशी झाली. ही गाडी सकाळी ९ वाजून २५ मिनिटाला पुण्यात पोहोचली. म्हणजे ही गाडी अवघ्या तीन तास वीस मिनिटांनी पुण्याला पोहोचली. दुपारी साडेबारापर्यंत ही गाडी पुण्यात थांबून होती. इथे टेस्टिंगचे काम सुरू होते. दुपारी चार वाजून पंचवीस मिनिटांनी पुण्याहून मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
रेल्वे थांबताना तसेच डोअर ओपन होण्यापूर्वी प्लॅटफार्मवर ऑटोमॅटिक स्टेप्स स्थिरावतात. त्यानंतरच डोअर ओपन होते. पहिल्या डब्यातून शेवटच्या सोळाव्या डब्यापर्यंत सहज जाता येते. सर्व खुर्च्या आरामदायी असून, प्रत्येक सीटिंगला चार्जिंग पाॅइंट आहे. दोन्ही बाजूने गाडी चालवण्याची विशेष सोय, त्यामुळे इंजिन बदलण्याची झंझट कायमची मिटली आहे. प्रत्येक डब्यात फोनची सुविधा असून, फोनवरून ट्रेन मॅनेजरशी प्रवासी संवाद करू शकतात. आपत्कालीन सेवेचा लाभ घेऊ शकतात. संपूर्ण गाडी वातानुकूलित असल्याने आरामदायी प्रवासाची सोय. ही वैशिष्ट्ये आहेत सोलापुरातून सुरू होणाऱ्या नवीन वंदे भारत रेल्वेची. गुरुवारी पहाटे ही गाडी बराच वेळ सोलापूर रेल्वे स्थानकावर थांबून होती. नवीन आणि ऑटोमॅटिक वंदे भारत रेल्वे पाहण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली होती.