माजी नगरसेविकेच्या पुत्रावर विनयभंगाचा गुन्हा दाखल; मारहाण, धमकी, फेक अकाउंटद्वारे अश्लील शिवीगाळीचा आरोप
By रवींद्र देशमुख | Published: June 19, 2024 06:16 PM2024-06-19T18:16:47+5:302024-06-19T18:17:13+5:30
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी आणि नमूद आरोपीची सोशल मीडियावरील चॅटिंगद्वारे १६ डिसेंबर २०२३ मध्ये ओळख झाली.
सोलापूर : सोशल मीडियावरील चॅटिंगद्वारे ओळख होऊन पुढे मोबाइलद्वारे संभाषणाने एकमेकांची मने जुळली. त्यानंतर झालेल्या वादातून मारहाण, धमकी अन् फेक अकाउंटद्वारे शिवीगाळ केल्याप्रकरणी एका पीडित तरुणीने माजी नगरसेविकेच्या पुत्राविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री विनयभंगाचा गुन्हा नोंदला आहे. १६ डिसेंबर २०२३ ते १७ जून २०२४ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विराज ऊर्फ जेकब जाॅन फुलारे (रा. रेल्वे लाइन्स, सोलापूर) असे गुन्हा नोंदलेल्या तरुणाचे नाव आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी आणि नमूद आरोपीची सोशल मीडियावरील चॅटिंगद्वारे १६ डिसेंबर २०२३ मध्ये ओळख झाली. त्यानंतर मोबाइलद्वारे संभाषण होऊन प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर अनेकदा वादविवाद झाले, मिटले. या काळात पीडितेच्या आणि नमूद आरोपीच्या दोन्ही बाजूने विरोध झाले.
अधूनमधून होणाऱ्या वाद व मारहाणीमुळे पीडितेने त्याच्याशी संबंध तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र पाठलाग करून ॲसिड फेकून मारण्याची धमकी दिली. मोबाइल फोडला. इन्स्टाग्रामचे फेक अकाउंट काढून त्याद्वारे शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सपोनि मुल्ला करीत आहेत.