परीक्षा जाहीर केली... अर्ज भरले... तयारी केली अन् आता सांगताहेत घेता येणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:26 AM2021-08-13T04:26:43+5:302021-08-13T04:26:43+5:30
सोलापूर : अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) न्यायालयाने रद्द केल्याने आता प्रवेश प्रक्रिया कशी होणार, याची ...
सोलापूर : अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) न्यायालयाने रद्द केल्याने आता प्रवेश प्रक्रिया कशी होणार, याची चिंता विद्यार्थी व पालकांना लागली आहे. आता दहावीच्या गुणांवरच प्रवेश मिळणार असल्याने मनासारखे कॉलेज मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. त्याचीच चिंता विद्यार्थ्यांना लागली आहे.
दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेणार असल्याचे शासनाने जाहीर केले होते. त्यानुसार सीईटीसाठी ऑनलाइन अर्जही मागण्यात आले. विद्यार्थ्यांनी सीईटीची तयारीही सुरू केली होती. मात्र, न्यायालयाने सीईटी परीक्षा घेता येणार नसल्याचे सांगून अकरावीच्या गुणांवरच प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत निर्देश दिले. दीड महिन्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. आता राज्य शासनाकडून प्रवेश प्रक्रियेसाठी काय निर्देश येतील, याची प्रतीक्षा लागली आहे. आपल्याला पाहिजे असलेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
---
विद्यार्थी स्थिती
दहावी उत्तीर्ण विद्यार्थी संख्या : ६८०१८
अकरावीची प्रवेश क्षमता : ७६७३६
शाखानिहाय जागा : कला : ३६१७१
विज्ञान : २९२३७
वाणिज्य : ११३२८
००००००००
आता प्रतीक्षा राज्य सरकारच्या निर्देशांची
सीईटी रद्द झाल्याने आता दहावीच्या गुणांवरच मेरिट लिस्ट लागणार आहे. नववीमध्ये काही विद्यार्थी खेळाकडे लक्ष दिल्याने त्यांना परीक्षेला बसता आले नाही, अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे आता राज्य शासनाकडून काय निर्देश येतील, त्यावर पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
-वासंती आयर, प्राचार्य, सोनी कॉलेज
सीईटी परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रमावस्था होती. सीईटी कोणत्या अभ्यासक्रमावर होणार आहे. हेही विद्यार्थ्यांना माहीत नव्हते. आता सीईटी रद्द झाल्याने थेट मेरिटनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाकडून नियमावली येणार आहे. त्यानुसारच प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
-प्रवीण देशपांडे, प्राचार्य, आयएमएस ज्युनिअर कॉलेज
०००००००००
विद्यार्थी चिंतेत
सीईटी परीक्षा व्हायला हवी होती. दहावी अभ्यासक्रमावरच ती परीक्षा होणार होती. त्यानुसार अभ्यास केला होता. सीईटीमुळे गुणवत्तेनुसार प्रवेश मिळाला असता. नववीत गुण कमी असलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसार होणार आहे. आता मिळेल, त्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार आहे.
-भूमिका मकाई, विद्यार्थी
सीईटी परीक्षा रद्द झाल्यामुळे हुशार विद्यार्थ्यांवर अन्यायच होणार आहे. आता जिथे प्रवेश घ्यायचा आहे. तिथे प्रवेश मिळणे अशक्य आहे. सीईटी परीक्षा झाली असती, तर मनासारख्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळविणे शक्य झाले असते.
-ऋचा शिंदे, विद्यार्थी