१०२ परीक्षा केंद्रावर ५१ हजार विद्यार्थी देताहेत बारावीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 01:18 PM2020-02-18T13:18:45+5:302020-02-18T13:21:01+5:30
सोलापूर जिल्ह्यातील बारावी परीक्षेला प्रारंभ; चोख बंदोबस्त, भरारी पथकाबरोबर व्हिडिओ कॅमेरा
सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेतल्या जाणाºया बारावीच्या परीक्षेला आज १८ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे़ शहर आणि जिल्ह्यातील ४१४ कनिष्ठ महाविद्यालयातील १०२ परीक्षा केंद्रांवर ५१ हजार ६९६ विद्यार्थी परीक्षा देत असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सूर्यकांत पाटील यांनी दिली.
बारावी परीक्षेवेळी कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी पाच भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत़ जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी परीक्षेच्या तयारीबाबत आढावा घेऊन सूचना दिल्या होत्या़ त्यानुसार कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी उपशिक्षणाधिकारी सुधा साळुंके, सुलभा वठारे, अशोक भांजे व प्राथमिक शिक्षण विभागाचे पथक कॉपी तपासणीसाठी आजपासून प्रत्येक पथकाबरोबर व्हिडिओ कॅमेराही आहे.
परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडण्यासाठी परीक्षा केंद्र परिसरात पुरेसा पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरातील झेरॉक्स, संगणक, इंटरनेटची दुकाने बंद करण्यात आली आहेत.
केंद्रप्रमुखांना आॅनलाईन माहिती कळवायची
- परीक्षा झाल्यानंतर किती विद्यार्थी उपस्थित व अनुपस्थित होते, कॉपीचा प्रकार घडला का याबाबत केंद्र प्रमुखांनी आॅनलाईन मंडळाला माहिती कळवायची आहे. यासाठी मोबाईल अॅप उपलब्ध करण्यात आले. सकाळच्या सत्रातील पेपर संपल्यानंतर तासभर व दुपारचे पेपर संपल्यानंतर सायंकाळच्या सत्रात ही माहिती अपलोड करायची आहे.