सोलापुरातील एम्प्लॉयमेंट अन् भैय्या चौकात खोदाई; बाळीवेसचा रस्ताही बंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 03:19 PM2020-07-25T15:19:14+5:302020-07-25T15:21:47+5:30
स्मार्ट सिटीचे काम : सोलापूरकरांनो, संचारबंदी संपल्यावर घराबाहेर निघण्यापूर्वी काळजी घ्या
सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेच्या कामासाठी शिवाजी महाराज चौक ते तरटी नाका, जुना एम्प्लॉयमेंट चौक परिसर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक (भैय्या चौक) या रस्त्यांवर खोदाई सुरू आहे. दोन दिवसांत लॉकडाऊन शिथिल होईल. त्यानंतर या रस्त्यावर नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
स्मार्ट सिटी योजनेतून शहरातील काही प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. काँक्रिटीकरणापूर्वी भुयारी गटार, पाणीपुरवठा लाईन, भुयारी वायरिंगची कामे केली जात आहेत. शिवाजी महाराज चौक ते तरटी नाका या मार्गावर सध्या काम सुरू आहे. रस्त्याच्या एका बाजूने खोदाई केली आहे.
मात्र गुरुवारी रात्री हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या कामासाठी मक्तेदाराला तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. पूर्ण बंद असलेला रस्ता एकेरी वाहतुकीसाठी लवकरच खुला होईल, असे स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाºयांनी सांगितले.
रामलाल चौक ते भैय्या चौक यादरम्यान काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. पावसाळ्यात भैय्या चौकात पाणी थांबते. या ठिकाणी नव्याने पावसाळी पाणी गटारीचे पाईप टाकण्यात येत असून, एन.जी. मिलच्या बाजूने जाणाºया नाल्याला जोडण्यात येत आहे. यासाठी चौकात खोदाई करण्यात आली होती. शुक्रवारी दिवसभरात काम पूर्ण झाले. परंतु, खोदाईमुळे रस्ता खराब झाला आहे. येथून जाताना काळजी घेणे आवश्यक आहे.
जुना एम्प्लॉयमेंट चौक, कामत हॉटेल हा रस्ता पावसाळी गटार टाकण्यासाठी खोदला आहे. शुक्रवारी हा रस्ता बंद होता. हे काम सोमवारपर्यंत पूर्ण होईल, असे स्मार्ट सिटीचे अधिकारी सांगत असले तरी पावसामुळे या कामाला विलंब लागू शकतो. त्यामुळे नागरिकांनी या रस्त्याऐवजी सात रस्ता, रंगभवन या रस्त्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे.
लक्ष्मी मंडई परिसरात चिखलच चिखल
पंचकट्टा ते लक्ष्मी मंडई परिसरात ड्रेनेजलाईनसाठी खोदाई करण्यात आली आहे. पावसाळ्याचे दिवस पाहता मक्तेदाराने रस्त्यावर चिखल आणि माती पसरू नये, याची काळजी घेतल्याचे दिसत नाही. हा रस्ता चिखलमय झाला आहे. या कामाबद्दल मक्तेदाराला सूचना देऊ, असे स्मार्ट सिटीच्या अधिकाºयांनी सांगितले.
लॉकडाऊनचा फायदा घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, एम्प्लॉयमेंट चौक येथील पावसाळी पाण्याच्या गटारीचे क्रॉसिंग पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न आहे. लॉकडाऊननंतर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा होईल. नागरिकांची गैरसोय होऊ नये, याबाबत दक्षता घेत आहे.
- तपन डंके, उपमुख्य तांत्रिक अधिकारी, स्मार्ट सिटी