२०२२-२३ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट काम, उमेद अभियानात सोलापूर राज्यात द्वितीय
By शीतलकुमार कांबळे | Published: April 22, 2023 05:06 PM2023-04-22T17:06:41+5:302023-04-22T17:06:52+5:30
बचतगटांना २७२ कोटींचे कर्ज वाटप.
सोलापूर : उमेद अभियानात सोलापूर जिल्हा परिषदेने २०२२-२३ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट काम केले. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
सामाजिक समावेशन, संस्थीय बांधणी, क्षमता बांधणी, उपजीविका, मार्केटिंग, महिला बचत गटांना वेगवेगळ्या प्रकारचा निधी देणे, वेगवेगळ्या विभागाच्या योजना महिला यांना मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. स्मार्ट योजना तसेच रुक्मिणी रानभाज्या महोत्सव, रुक्मिणी दिवाळी महोत्सव आदी उपक्रम जिल्ह्यात घेण्यात आले. त्यामुळे जिल्ह्याने दुसरा क्रमांक पटकाविला. वेगवेगळ्या विषयाचे १०० गुणांवरून क्रमांक निश्चित करण्यात आले. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात ९०.७ मार्क मिळाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी व राज्य अभियान व्यवस्थापक नितीन हरचेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, जिल्हा व्यवस्थापक राहुल जाधव, संतोष डोंबे, मीनाक्षी मडीवळी, दयानंद सरवळे, अमोल गलांडे यांनी विविध उपक्रम राबविण्यासाठी नियोजन केले.
बचतगटांना २७२ कोटींचे कर्ज वाटप
महिला बचत गट यांचे बँक कर्जाचे उद्दिष्ट २१२ कोटी होते; परंतु एकूण २७२ कोटी बँक कर्ज वाटप करण्यात आले. महिलांची दूध डेअरी हादेखील विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्वांनी झटून काम केले. सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करीत असल्याचे सीईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.