खाजगी लॅबमधून रिपोर्टची अदलाबदल; डॉक्टरानी नाव न पाहताच केले उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:24 AM2021-05-27T04:24:03+5:302021-05-27T04:24:03+5:30

लक्ष्मी टाकळी (ता. पंढरपूर) येथील लक्ष्मण शिंदे हे कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यांच्याकडे राहण्यासाठी वेगळी खोली होती. त्यामुळे त्यांनी घरीच ...

Exchange of reports from private labs; The doctor did the treatment without seeing the name | खाजगी लॅबमधून रिपोर्टची अदलाबदल; डॉक्टरानी नाव न पाहताच केले उपचार

खाजगी लॅबमधून रिपोर्टची अदलाबदल; डॉक्टरानी नाव न पाहताच केले उपचार

Next

लक्ष्मी टाकळी (ता. पंढरपूर) येथील लक्ष्मण शिंदे हे कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यांच्याकडे राहण्यासाठी वेगळी खोली होती. त्यामुळे त्यांनी घरीच उपचार घेणे पसंत केले. शिंदे यांच्यावर डॉ. वृक्षाली पाटील या उपचार करत होत्या. डॉ. पाटील यांनी शिंदे यांना रक्ताच्या काही तपासण्या गायत्री क्लिनिकल लॅब (भोसले चौक, पंढरपूर) मधून करून घेण्यास सांगितले. यानंतर लॅबमधील एकजण येऊन शिंदे यांचे रक्त तपासणीसाठी घेऊन गेला. मात्र, त्याने शिंदे यांना रक्त तपासणीचा रिपोर्ट देताना शिंदेंऐवजी संतोष माने या व्यक्तीचा रिपोर्ट दिला.

या रिपोर्टवरील नाव लक्ष्मण शिंदे यांनी पाहिले नाही, डॉक्टरांनीही पाहिले नाही. लक्ष्मण शिंदे यांच्यावर संतोष माने यांच्या रक्ताच्या रिपोर्टनुसार उपचार करण्यात आले. पाचव्या दिवशी शिंदे यांच्या पत्नीने रक्ताच्या रिपोर्टवरचे नाव तपासले. त्यानंतर शिंदे यांनी लॅबशी संपर्क केला, त्यावेळी लॅबमधील एकाने चुकून रिपोर्ट बदलून दिल्याचे कबूल केले व तत्काळ शिंदे यांना त्यांच्याच रक्ताचे रिपोर्ट आणून दिले. या उपचारादरम्यान शिंदे यांना आरोग्याबद्दल कोणताही त्रास झाला नाही. मात्र, मानसिक त्रास अधिक झाल्याचे त्यांनी सांगितले.

रक्ताच्या चाचणीतील फरक

संतोष माने यांच्या रक्ताच्या चाचणीत रिपोर्टमध्ये सी रिॲक्टिव्ह प्रोटीन (८४.१८), डी - डीमर टेस्ट (एलडीएच लेव्हल ५८७.४२), ब्लड ग्लुकोज (१६५.२४), हिमोग्रम रिपोर्ट न्यूट्रोफिल डब्ल्यूबीसी (८७.१) असा आला होता, तर लक्ष्मण शिंदे यांच्या रक्ताचा रिपोर्ट मध्ये सी रिॲक्टिव्ह प्रोटीन (८९.२२), डी-डीमर टेस्ट (एलडीएच लेव्हल ६१०.३२), ब्लड ग्लुकोज (२४१.१०), हिमोग्रम रिपोर्ट टोटल डब्ल्यूबीसी काउंट (२०००), पेरिफेरल स्मीयर डब्ल्यूबीसी (ल्युकोपेनिया), टोटल प्लेटलेट (९८०००) असा होता.

----

अगोदरच कोरोना झाल्याने घाबरलो होतो. काही कळत नसल्याने न वाचताच रक्ताच्या तपासणीचा रिपोर्ट डॉक्टरांना दाखविला. त्यांनीही त्यानुसार उपचार केले. मात्र, सहज माझ्या पत्नीने रिपोर्टवरचे नाव वाचले. त्यावेळी तिला कळाले, हा माझा नाही. चुकीचा रिपोर्ट दिल्याने माझ्यावर चुकीचे उपचार मिळाले. याचा विचार करून मला खूप मानसिक त्रास झाला. अशा लॅबधारकांवर कायदेशीर कारवाई करावी.

- लक्ष्मण शिंदे, लक्ष्मी टाकळी, ता. पंढरपूर.

----

लक्ष्मण शिंदे यांच्या रक्ताची तपासणी आमच्याच लॅबमधून केली होती. त्यांना चुकून रिपोर्ट दुसऱ्या माणसाचा देण्यात आला आहे. मात्र, याचा त्यांना काही त्रास झाला नाही.

- नानासाहेब देवकर, गायत्री क्लिनिकल लॅब, पंढरपूर

----

रिपोर्टची अदलाबदल झाली होती. लक्ष्मण शिंदे यांच्यावर योग्य उपचार करण्यात आले आहेत. यामुळे त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे. त्यांनी घाबरण्याची गरज नाही.

- डॉ. वृषाली पाटील, पंढरपूर

Web Title: Exchange of reports from private labs; The doctor did the treatment without seeing the name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.