३ ढाब्यांवर 'एक्साईज'च्या धाडी; १९ मद्यपींसह ३ हॉटेल चालकांविरूद्ध गुन्हे दाखल
By Appasaheb.patil | Published: November 24, 2022 06:43 PM2022-11-24T18:43:01+5:302022-11-24T18:43:14+5:30
सोलापूरमधील ३ ढाब्यांवर 'एक्साईज'च्या धाडी टाकण्यात आल्या असून १९ मद्यपींसह ३ हॉटेल चालकांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने २३ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास शहरातील ३ धाब्यांवर अचानक धाडी टाकून धाबा चालकांसह त्या ठिकाणी दारु पितांना आढळून आलेल्या १९ मद्यपी ग्राहकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, २३ नोव्हेंबर मिळालेल्या बातमीच्या आधारे निरीक्षक अ विभाग यांनी त्यांच्या स्टाफसह शहरातील ३ धाब्यांवर धाडी टाकून कारवाई केली. निरिक्षक संभाजी फडतरे यांचे पथकाने उत्तर सोलापूर तालुक्यातील केगाव-देगाव रोडवरील हॉटेल जयभवानी फॅमिली गार्डन धाब्यावर छापा टाकून धाबा चालक बाबाराव हरीबा जाधव (वय ४९ रा. केगाव-देगाव रोड) यांच्यासह ९ मद्यपी ग्राहक असे एकूण १० जणांना व दुय्यम निरिक्षक पुष्पराज देशमुख यांचे पथकाने सोलापूर-पुणे महामार्गावरील दक्खनचा वाडा या धाब्यावर धाड टाकून धाबा चालक गणेश सुभाष मोरे व ६ मद्यपी ग्राहक असे एकूण ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
तसेच दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ यांनी त्यांच्या पथकासह हैदराबाद रोडवरील विडी घरकुल परिसरातील हॅाटेल लक्ष्मी या धाब्यावर अवैधरीत्या ग्राहकांना दारु पिण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देणाऱ्या चालक राजेश सिद्राम बिंगी व त्याठिकाणी दारु पित बसलेल्या ४ ग्राहक असे एकूण ५ जणांना अटक केली. अटक आरोपींच्या ताब्यातून विविध ब्रॅंडच्या विदेशी मद्याच्या व बीअरच्या बाटल्या, प्लास्टीक व काचेचे ग्लास इ. असे एकूण चार हजार तीनशे सत्तर किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन गुन्हयाचे तपास अधिकारी यांनी २४ नोव्हेंबर रोजी एक दिवसात गुन्ह्याचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले असता दारूबंदी न्यायालयाच्या न्यायदंडाधिकारी नम्रता बिरादार यांनी तात्काळ निकाल देत तिन्ही ढाबाचालकांना प्रत्येकी २५ हजार व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी दोन हजार असा एकूण १ लाख १३ हजारांचा दंड ठोठावला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक सुनील चव्हाण, अनिल चासकर विभागीय उप-आयुक्त, पुणे यांचे आदेशान्वये अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संभाजी फ़डतरे, सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ, पुष्पराज देशमुख, सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, जवान चेतन व्हनगुंटी, शोएब बेगमपूरे, प्रियंका कुटे, व वाहनचालक रामचंद्र मदने यांनी पार पाडली.