सूर्यफूल पीक विमा संरक्षणापासून वगळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:23 AM2021-07-27T04:23:21+5:302021-07-27T04:23:21+5:30
तालुक्यामध्ये नदीकाठ व कालवा परिसर वगळता इतर सर्व परिसर दुष्काळी पट्ट्यात येतो. यामुळे या भागातील शेती पावसावर अवलंबून आहे. ...
तालुक्यामध्ये नदीकाठ व कालवा परिसर वगळता इतर सर्व परिसर दुष्काळी पट्ट्यात येतो. यामुळे या भागातील शेती पावसावर अवलंबून आहे. खरिपामध्ये बाजरी, तूर, सूर्यफूल, मका, उडीद, कांदा, हुलगे, मटकी ही पिके घेतली जातात. आठही महसूल मंडळांमध्ये गतवर्षीपासून कापसाचा विमा भरण्याचे आवाहन केले जाते. प्रत्यक्षात मात्र तालुक्यात कापसाचे क्षेत्रच अस्तित्वात नाही. मात्र, कमी पाण्यात व चांगले उत्पन्न देणारे पीक सूर्यफुलाला विमा संरक्षणापासून वगळले आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. याबाबत भाजपचे आ. समाधान आवताडे यांनी लक्ष देऊन सूर्यफुलाचा विमा संरक्षणात समावेश होण्याबाबत प्रयत्न करण्याची गरज आहे.
कोट ::::::::::::::::::
गेल्या दोन वर्षांपासून कृषी विभागाने ठेवलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त क्षेत्रावर सूर्यफूल पेरणी होत आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही बियाणाचा तुटवडा निर्माण झाला. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सूर्यफूल पेरणी केली आहे. अशा परिस्थितीत या पिकाला विमा संरक्षण देणे आवश्यक आहे.
- सोमनाथ नकाते, खते-बियाणे विक्रेते, मंगळवेढा
कापसाच्या विम्यासाठी आग्रह
कापसाचे क्षेत्र नसताना प्रधानमंत्री फसल बीमा योजनेत विमा भरण्याचा आग्रह सरकार आणि विमा कंपनी करीत आहे. वास्तविक पाहता तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून सूर्यफुलाचे क्षेत्र आहे. त्या पिकाला विमा संरक्षण का देत नाही, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार यांनी उपस्थित केला आहे.