कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मुलाने केली ‘विठ्ठला’ची नित्यपूजा; वारकरी सांप्रदायातून संताप
By रवींद्र देशमुख | Published: July 30, 2023 06:30 PM2023-07-30T18:30:45+5:302023-07-30T18:30:52+5:30
विठ्ठल-रुक्मिणीची दररोज नित्य महापूजा होत असते. ही पूजा भाविकांच्या हस्ते करण्यासाठी हजारो रुपयांची देणगी स्वीकारली जाते.
सोलापूर : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा कोणताही ठराव न करता मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या चिरंजीवांच्या हस्ते विठ्ठलाची नित्य महापूजा दुधाचा अभिषेक घालून करण्यात आली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच वारकरी सांप्रदायातून तीव्र संताप व्यक्त झाला. या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी वारकरी पाईक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. रामकृष्ण महाराज वीर यांनी केली आहे.
विठ्ठल-रुक्मिणीची दररोज नित्य महापूजा होत असते. ही पूजा भाविकांच्या हस्ते करण्यासाठी हजारो रुपयांची देणगी स्वीकारली जाते. मात्र सर्वसामान्य भाविकांना नित्यपूजेचा मान मिळत नाही. मंदिर समिती कार्यकारी अधिका-यांना कुटुंबासह नित्यपूजा करायची असेल तर मंदिर समितीचा ठराव करणे बंधनकारक असते. मात्र कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या चिरंजीवाने विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा कोणताही ठराव न करता नित्यपूजेचा महाअभिषेक केला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
मंदिर सरकारकडे आल्यानंतर विषमता दूर होऊन भाविकांना समानतेची वागणूक मिळेल, ही आशा फोल ठरली आहे. मागील काळात गाभा-यात झालेले अंघोळीचे प्रकरण असो, सभामंडपात भजनबंदीचा आदेश असो की अधिका-याचा मुलगा आता केलेला दुग्धाभिषेक असो, या गोष्टीमुळे सामान्य वारकरी भाविक व्यथित होतो. नित्यपुजेला हजारो रूपये मोजूनही असा अभिषेक करता येत नाही. मग संतांनी सांगितलेली हरिदासाच्या (वारकऱ्यांच्या) घरी मज उपजवा जन्मांतरी। हे सोडून आता अधिकाऱ्यांच्या घरी आम्हाला जन्माला घाला म्हणजे अशी पूजा करता येईल, असं मागणं विठ्ठलाला मागावं का? असा प्रश्न सामान्य वारकरी म्हणून पडला आहे. यावर तत्काळ कारवाई होणे अपेक्षित आहे. - रामकृष्ण महाराज वीर, प्रदेशाध्यक्ष, वारकरी संप्रदाय पाईक संघ.