तंदुरुस्तीसाठी व्यायाम करा पण जपून अतिव्यायाम ठरु शकतो धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:26 AM2021-08-13T04:26:52+5:302021-08-13T04:26:52+5:30
पंढरपूर : व्यायाम करणे आरोग्यासाठी चांगले आहे, पण आरोग्य चांगले राहण्यासाठी व्यायाम योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात होणे आवश्यक ...
पंढरपूर : व्यायाम करणे आरोग्यासाठी चांगले आहे, पण आरोग्य चांगले राहण्यासाठी व्यायाम योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात होणे आवश्यक असते. अतिव्यायामाचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. याउलट, अतिव्यायामाने रक्तदाब, श्वासोत्सवासात अनियमितता अशा समस्या उदभवतात. चिडचिडेपणा वाढून उदासवाणे वाटते. यासाठी खबरदारी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
पोलीस आयुक्तालयातील साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास भोसले यांचा बुधवारी सकाळी सातच्या सुमारास जीममध्ये व्यायाम करत असताना हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यानंतर पंढरपुरातील व्यायामप्रेमींशी व व्यायामाचे शिक्षण देणाऱ्यांशी संवाद साधला. व्यायाम कसा करावा, किती वेळ करावा, याबाबत त्यांनी अनेक सूचना केल्या आहेत.
----
शरीर सुदृढ करणे, वजन कमी करणे किंवा तत्सम उद्दिष्ट डोळ्यांसमोर घेऊन तुम्ही व्यायाम सुरू करता. पण, अतिव्यायामाचा ताण शरीरावर आल्यास यातील कोणतेही उद्दिष्ट तुम्हाला साध्य करता येणार नाही. आवश्यकतेपेक्षा अधिक व्यायाम करणे, शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. स्नायूंची पुनर्बांधणी होण्याकरिता शरीराला आराम मिळणे अत्यावश्यक आहे. प्रत्येकाने किती व्यायाम करावा, हे वयानुरूप, शरीराच्या क्षमतेनुसार आणि आहारावर अवलंबून असते. यामुळे जीम ट्रेनरचा सल्ला घेतल्याशिवाय अधिक व्यायाम करू नका, असे गणेश पवार यांनी सांगितले.
---
हा गैरसमज काढून टाका
आठवड्यातून किमान १५० मिनिटे व्यायाम करणे उत्तम आहे. गरजेपेक्षा कमी प्रमाणात व्यायाम होत असेल, तर ते सहजपणे लक्षात येऊ शकते. पण, शारीरिक गरजेपेक्षा अधिक व्यायाम करणेदेखील फायद्याचे नाही. अधिक व्यायाम करणे म्हणजे अधिक फायदा हा गैरसमज मनात असल्यास तो आधी काढून टाका.
- जीम ट्रेनर प्रवीण राऊत
--
रात्रपाळीत केले तरी पहाटे जीममध्ये
मी सध्या पाेलीस सेवेत आहे. १०० मीटरमध्ये वेगवान धावपटू आहे. सहा वर्षांपासून व्यायाम करतो. व्यायामाचा एक नियम आहे, तो म्हणजे फिटनेस आणि स्टॅमिना. त्या नियमानुसार व्यायाम करतो. यासाठी आहारदेखील महत्त्वाचा आहे. मी रात्रपाळीमध्ये काम केले तरीही रोज पहाटे पाच वाजता व्यायामाला जातोच, परंतु हे सर्व करताना व्यायामतज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे.
- सुरज हेंबाडे, पाेलीस कर्मचारी
---
जास्त प्रमाणात व्यायाम करणे तुमच्या शरीरासाठी योग्य नाही हे समजून घ्या. पुरेसा आराम करा आणि व्यायामाचे प्रमाण आटोक्यात ठेवा. अतिव्यायाम करण्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवरसुद्धा होऊ शकतो. सतत चिडचिड होणे, उदासवाणे वाटणे, चिंतेचे प्रमाण वाढणे, ही अति व्यायाम करण्याची लक्षणे असू शकतात. व्यायामाचे असे परिणाम होणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
- डॉ. सचिन गुटाळ
--