मतदारांच्या गाठीभेटीसाठी तारेवरची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:10 AM2021-01-08T05:10:13+5:302021-01-08T05:10:13+5:30
गावगाड्यात निवडणुकीचा प्रचार करत उमेदवारांना ८ दिवसातच संपूर्ण प्रभाग पिंजून काढावा लागणार आहे. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना तारेवरची कसरत ...
गावगाड्यात निवडणुकीचा प्रचार करत उमेदवारांना ८ दिवसातच संपूर्ण प्रभाग पिंजून काढावा लागणार आहे. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कमी काळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने उमेदवारांनी प्रचाराची राळ उडविली आहे. अत्यंत अटीतटीच्या व प्रतिष्ठेच्या असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.
कॉर्नर सभा, प्रचार रॅली, मतदारांच्या ‘होम टू होम’ गाठीभेटी घेत प्रचार सुरू झाला आहे. प्रत्येक प्रभागात त्या-त्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्त्यांवर जबाबदारी निश्चित करून दिली आहे. घरोघरी फिरून कार्यकर्ते आपल्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहेत. थेट प्रचाराबरोबरच सोशल मीडियाचाही आधार प्रचारासाठी घेतला जात आहे़ व्हॉटस्अॅप, फेसबुकद्वारे उमेदवार मतदारांच्या संपर्कात राहत आहेत. उमेदवार व कार्यकर्ते बाहेरगावी असलेल्या मतदारांची नावे शोधून त्यांना मतदानाची तारीख आणि मतदान केंद्राची माहिती देत आहेत.