फसव्या भाजपला हद्दपार करा : सुशीलकुमार शिंदे, अक्कलकोट येथील सभेत केले वक्तत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:06 AM2017-11-17T11:06:13+5:302017-11-17T11:07:39+5:30
सरपंच पद हे लहान नसून हे पद भूषविलेले बहुतांश सरपंच मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. भविष्यकाळात सरपंचातूनच एखादा मुख्यमंत्री होऊ शकतो.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
अक्कलकोट दि १७ : सरपंच पद हे लहान नसून हे पद भूषविलेले बहुतांश सरपंच मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. भविष्यकाळात सरपंचातूनच एखादा मुख्यमंत्री होऊ शकतो. काँग्रेस सर्वसामान्यांचा पक्ष असून हा पक्ष सत्तेपासून दूर गेल्याने सर्वसामान्य व दीनदलितांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आगामी काळात या फसव्या भाजप सरकारला हद्दपार करा, असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
अक्कलकोट येथे काँग्रेस पुरस्कृत निवडून आलेल्या नूतन सरपंच व सदस्यांचा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. सिद्धाराम म्हेत्रे, आ. प्रणिती शिंदे, आ. भारत भालके, आ. रामहरी रूपनवर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, गोकूळ शिंदे, जि. प. कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, उपसभापती प्रकाश हिप्परगी, नगरसेवक चेतन नरोटे, महेश इंगळे, रईस टिनवाला, शहराध्यक्ष भीमाशंकर कापसे, नगरसेवक सद्दाम शेरीकर, दीपामाला आडवितोटे, सावित्री पुजारी, विकास मोरे, पं. स. सदस्य विलास गव्हाणे, जि. प. सदस्या स्वाती शटगार उपस्थित होते.
आ. सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले की, भारतीय जनता पार्टी केंद्रात व राज्यात सत्तेवर आली. तेव्हा-तेव्हा राज्य व देश देशोधडीला लागला. आगामी लोकसभेसाठी सुशीलकुमार शिंदे यांनी उमेदवारी घ्यावी. त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी आम्ही सर्व काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी तयार असल्याचे सांगितले. आ. भारत भालके म्हणाले की, केंद्र व राज्यातील भाजप सरकार फसवे व लबाड आहे. सर्वसामान्यांचा विचार पायदळी तुडविणारा आहे. आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत भाजपला हद्दपार करा, असे आवाहन केले.
यावेळी राजशेखर हिप्परगी, महेश जानकर, बसवराज माशाळे, महिबूब मुल्ला, दिलीप बिराजदार, सिध्दार्थ गायकवाड, सुनंदा गायकवाड तर काँग्रेस कार्यालय प्रमुख विश्वनाथ हडलगी यांच्यासह सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सातलिंग शटगार यांनी केले तर सूत्रसंचालन आय. आय. हत्तुरे यांनी केले. आभार दिलीप बिराजदार यांनी मानले.