दुय्यम निबंधक कार्यालयाचा वनवास संपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:21 AM2021-03-18T04:21:39+5:302021-03-18T04:21:39+5:30
सांगोला तहसील कार्यालयाच्या आवारात तब्बल १३४ वर्षापासून अभिलेख कक्ष व नोंदणी कक्ष असे दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज सुरू आहे. ...
सांगोला तहसील कार्यालयाच्या आवारात तब्बल १३४ वर्षापासून अभिलेख कक्ष व नोंदणी कक्ष असे दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज सुरू आहे. येथे दुय्यम निबंधक, दोन लिपिक, संगणक ऑपरेटरसह कर्मचारी एकत्र बसून दैनंदिन कार्यालयीन कामकाज पाहतात. तालुक्यातून मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आलेल्या पक्षकारांना या कार्यालयात धड नीट उभाही राहता येत नव्हते. तर अधिकारी कर्मचाऱ्यांसह पक्षकारांची दस्त नोंदणी करताना दमछाक होत होती. कार्यालयाची ही अवस्था पाहून तत्कालीन सोलापूर जिल्हा मुद्रांक अधिकारी दुतोंडे यांनी सांगोला येथील दुय्यम निबंधक कार्यालयास स्वतंत्र इमारत असावी, म्हणून नोंदणी व मुद्रांक विभागाकडे पाठपुरावा करून स्वतंत्र प्रशासकीय इमारत मंजूर करून घेतली आहे.
अर्थसंकल्पीय ४०/५९ कार्यक्रमांतर्गत १ कोटी ३० लाख रुपये मंजूरी मिळाली होती. या निधीतून ठेकेदाराकडून २८ मे २०१९ रोजी प्रत्यक्षात इमारतीच्या बांधकामास सुरुवात झाली. प्रत्यक्षात २७ मे २०२० पर्यंत हे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र कोरोनाच्या काळात बांधकामाचे काम रखडल्याने नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. सध्या या कार्यालयातील अंतर्गत विज, फर्निचर व संरक्षक भिंत,प्लेव्हींग ब्लॉक बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून मार्चअखेर पूर्ण होईल, असे शाखा अभियंता के. यु. गिरी यांनी सांगितले.
वाहतूक कोंडीस सुटण्यास होणार मदत
सांगोला तहसील कार्यालयाच्या आवारात तहसील कार्यालयासह पुरवठा शाखा, निवडणूक कार्यालय, रेकॉर्ड रूम, दुय्यम निबंधक कार्यालय, सेतू कार्यालय आदी कार्यालय एकाच ठिकाणी असल्याने या ठिकाणी नागरिक, महिला, आबालवृद्ध पक्षकारांची नेहमीच गर्दी होत होती. परिणामी तहसील कार्यालयासमोर दुचाकी, चारचाकी वाहनांमुळे वाहतुकीची नेहमीच कोंडी होत होती. आता दुय्यम निबंधक कार्यालय नवीन जागेत स्थलांतर झाल्यानंतर पक्षकारांची गर्दी व वाहनांची संख्या कमी होऊन तहसील कार्यालयासमोर गर्दी कमी होण्यास मदत होणार असल्याचे शिवसेना शहरप्रमुख कमरुद्दीन खतीब यांनी सांगितले.
फोटो ओळ ::::::::::::::
सांगोला तहसील कार्यालयाच्या शेजारी नवीन प्रशासकीय दुय्यम निबंधक कार्यालयाची इमारत बांधून तयार असल्याचे छायाचित्र.