चांगलं काम करण्याची उम्मीद...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 03:06 PM2019-03-21T15:06:11+5:302019-03-21T15:07:12+5:30
स्वत:बरोबरच इतरांसाठीही आपण जगले पाहिजे; इतरांसाठीही काही काम केले पाहिजे.
मागील सुमारे वीस वर्षांत अनेक महामानवांच्या व पराक्रमी स्त्री-पुरुषांच्या जीवनचरित्रांचे अध्ययन मी केले आहे. भारतातील केवळ बुद्ध आणि बाबासाहेबच नाही तर महात्मा फुले, शाहू महाराज, शिवाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस यांसारख्या भारतीय महापुरुषांसोबतच अब्राहम लिंकन, विन्स्टन चर्चिल, जॉर्ज कार्व्हर यांसारख्या अनेक पराक्रमी व्यक्तींच्या जीवनचरित्रांचे अथवा जीवनक्रमाचे मी यथाशक्ती अध्ययन केले आहे.
ते करताना मला नेहमी असे जाणवत राहिले आहे की, आयुष्याच्या सुरुवातीच्या कालखंडात, हे सर्व महापुरुष अथवा पराक्रमी स्त्री-पुरुष हे तुमच्या माझ्यासारखे किंवा आपल्या सर्वांसारखे अगदी सामान्य मानवच होते. नंतरच्या आयुष्यात मात्र जसजसे विविध गोष्टींकडे त्यांचे लक्ष वेधले गेले तसतसे त्यांच्या आचारविचारांत, प्राधान्यक्रमांत व जीवनध्येयांत बदल होत गेले. त्या-त्या क्षणी त्यांना जे-जे योग्य वाटले ते-ते साध्य करण्यासाठी जीवनातील इतर सुखांकडे, लोकनिंदेकडे, विरोधांकडे ते दुर्लक्ष करत गेले व जसजसे ते या गोष्टी हळूहळू पण सातत्याने करत गेले तसतसे ते अलौकिक पुरुष बनत गेले. ते चांगले मानव, महापराक्रमी मानव किंवा महामानव बनत गेले.
महापुरुष किंवा पराक्रमी पुरुष बनत असतानाचा हा प्रवास या सर्वांसाठी सारखाच आहे! त्याच्या तपशिलात काही बदल आहेत. पण सुरुवात सारखीच आहे, मध्य सारखाच आहे व अंतही सारखाच आहे. त्यात विशेष असा कोणताही फरक नाही. मागील सुमारे वीस वर्षांत अशा अनेक महामानवांच्या जीवनक्रमाचे मी जसजसे परिशीलन करत गेलो तसतसे त्यांनी आक्रमिलेल्या जीवनपथाविषयी माझ्या मनात मोठे आकर्षण निर्माण होत गेले. आपणही त्यांच्यासारखेच जगावे, असे मला सातत्याने वाटू लागले. ‘माझी डॉक्टरेट’ हे या आणि अशा विचारांनाच आलेले एक अत्यंत परिपक्व फळ आहे, असे मला वाटते.
या दिशेने आजवर मी जे काही केले ते जर माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मी केले असते तर कदाचित फार काळ मला या पथावरून चालता आले नसते! पण स्वार्थापेक्षा परमार्थाची भावना प्रबळ असल्यानेच कदाचित मला आजवर समोर आलेल्या अडीअडचणींची, मान-अवमानांची किंवा संकटांची फारशी फिकीर वाटलेली नाही.
आपले नाणे खणखणीतपणे वाजवून दाखवण्यापूर्वी कोणालाही या जगाने डोक्यावर उचलून धरलेले नाही की कोणाचाही पुरेसा सन्मान केलेला नाही. त्यामुळेच मला असे वाटते की, आपल्यापैकी कोणत्याही कार्यक्षम व्यक्तीने अवमानांनी, विरोधाने किंवा छळवादाने घाबरून किंवा गांगरून जाता कामा नये.
आज मला केवळ स्वत:पुरते मर्यादित होऊन जगावे, असे कधीही वाटत नाही. स्वत:बरोबरच इतरांसाठीही आपण जगले पाहिजे; इतरांसाठीही काही काम केले पाहिजे, असे मला नेहमी वाटते. हा विचार अनेक महामानवांच्या जीवन चरित्रांतूनच माझ्या मनात रुजला आहे. आपल्यातला प्रत्येक जण जर इतरांसाठीही थोडाफार झटू लागला तर आयुष्यभर केवळ स्वत:साठीच झटत राहण्याची फारशी गरज कोणाला वाटणार नाही! पण दुर्दैवाने आपल्या समाजात आजवर असे झालेले नाही. मला काही फक्त एकट्यासाठीच कुठला मानमरातब, प्रतिष्ठा किंवा सन्मान मिळवायचा आहे, अशातला भाग नाही. मला काही माझ्या एकट्यासाठीच एखादे विशेष स्वातंत्र्य वगैरे मिळवायचे आहे, अशातलाही भाग नाही!
या सगळ्या गोष्टी तर प्रत्येकालाच मिळाल्या पाहिजेत, या मताचा मी आहे! मला जे काही मिळवायचे आहे ते आपल्या सर्वांसाठीच मिळवायचे आहे. पण ते आपोआप मिळणार नाही, याचीही मला पूर्ण जाणीव आहे. आपल्याला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी आपल्याला प्रदीर्घ काळ काम करावे लागणार आहे. आपल्याला अत्यंत चांगले काम करावे लागणार आहे आणि सध्यातरी मी तेच करण्याचा प्रयत्न करत आहे. भारतातील कोट्यवधी गोरगरिबांवर होत असलेल्या सामाजिक अन्यायाचा आणि अनुषंगिक समस्यांचा अभ्यास करून त्या क्षेत्रात मी मिळवलेली ‘डॉक्टरेट’ हे मी त्याच दिशेने टाकलेले एक अत्यंत छोटेसे पाऊल आहे !
- डॉ. रविनंद नामदेव होवाळ
(लेखक हे साहित्यिक आहेत.)