महावितरण बारामती परिमंडलाचा वेगवान कारभार; २४ तासांत ६१० तर ४८ तासांत ६९३ वीज जोडण्या
By Appasaheb.patil | Published: August 9, 2023 06:31 PM2023-08-09T18:31:44+5:302023-08-09T18:31:59+5:30
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी पदभार घेतल्यापासून कंपनीच्या ग्राहकसेवा गतिमान करण्यावर विशेष भर दिला आहे.
सोलापूर : महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी पदभार घेतल्यापासून कंपनीच्या ग्राहकसेवा गतिमान करण्यावर विशेष भर दिला आहे. बारामती परिमंडलात याचे चांगले परिणाम दिसून येत असून, मागील ५० दिवसांत पैसे भरल्यापासून अवघ्या २४ तासांत ६१० तर ४८ तासांत ६९३ वीज जोडण्या देण्याचे काम वीज कर्मचाऱ्यांनी केले आहे.
विजेच्या विविध सेवांसाठी मा. महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने कृती मानके ठरवून दिली असून, प्रत्येक सेवेसाठी कालमर्यादा निश्चित केली आहे. मात्र या मानकांना कमाल समजून विहित मुदतीची वाट न पाहता आपण स्वत:हून ग्राहक सेवेची पूर्तता करणे हे ग्राहकांप्रती संवेदनशील आहोत याचे द्योतक आहे. तसेच ग्राहकांना वेळेत व नियमितपणे वीज जोडण्या दिल्या तर वीजचोरी कमी होऊन कंपनीच्या महसूलात भर पडेल तसेच ग्राहक व कंपनीतील संबंध अधिक दृढ होतील यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी २४ ते ४८ तासांत जोडण्या देण्याचे निर्देश सर्व क्षेत्रीय अभियंत्यांना दिले आहेत. याकामी संचालक (संचालन) संजय ताकसांडे व प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी युद्धपातळीवर अंमलबजावणी केली आहे.
बारामती परिमंडलात मुख्य अभियंता सुनिल पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली १ जुलै ते ९ ऑगस्ट या ५० दिवसांत १३०३ वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यातील ६१० वीज जोडण्या २४ तासांत तर ६९३ जोडण्या ४८ तासांत दिले आहेत. दररोज या कामांचा वेग वाढतच चालला आहे. चालू महिन्यात आतापर्यंत १९७ जोडण्या देण्याचे काम झाले आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादी शुन्याकडे जात आहे. वीज ग्राहकांनीही या जलद सुविधांचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळाचा व मोबाईल ॲपचा वापर करुन विविध वीज सेवांचा ऑनलाईन लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.