आरोग्य विभागातील खर्चाची चौकशी होणार; सीईंओंचा समिती नियुक्तीला हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 01:19 PM2020-12-02T13:19:44+5:302020-12-02T13:23:51+5:30
वाद; जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आरोग्य विभागाच्या खर्चावरून वादंग
सोलापूर : कोरोना साथीच्या काळात आरोग्य विभागाने केलेल्या खर्चाबाबत समिती नियुक्त करण्याची सूचना मंगळवारी (दि.१) मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रशासन विभागाला दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आरोग्य विभागाच्या खर्चावरून वादंग निर्माण झाले होते. चर्चेअंति कोरोना काळात औषध व साहित्य खरेदीसाठी झालेल्या खर्चाची चौकशी करण्याचा ठराव करण्यात आला आहे. यासाठी चौकशी समिती नियुक्त करण्याचे ठरले आहे. हा ठराव होऊन एक महिना होत आला तरी प्रशासनाकडून अद्याप कोणतीच हालचाल दिसली नाही. ही बाब निदर्शनाला आणून देताच मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी सभेत ठरल्याप्रमाणे चौकशी समिती नियुक्त करा, अशा सूचना दिल्या आहेत.
समितीवरूनच आहे वादंग
स्थायी समितीच्या सभेत आरोग्य विभागाच्या खर्चाची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा ठराव करण्यात आला. या समितीत सदस्य असतील असे नमूद केले आहे, पण चौकशी समितीत सदस्यांना घेता येते काय यावरच आता वादंग निर्माण झाल्याने हा प्रस्ताव पडून असल्याचे सांगण्यात आले. कोरोना साथीच्या काळात आरोग्य विभागाने गरजेचे साहित्य खरेदी करण्यात हयगय केली व खरेदी केलेले साहित्य आरोग्य केंद्रापर्यंत निम्मेच पोहोचले असे आक्षेप आहेत.
जागांची मागविली माहिती
कुमठे शाळेची जागा देण्यावरून झालेल्या ठरावाची गंभीर दखल मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी घेतली आहे. याबाबतची सर्व माहिती त्यांनी शिक्षण विभागाकडून मागविली आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या मोकळ्या जागा व त्यावर अतिक्रमण आहे काय याबाबतही ग्रामपंचायत विभागाला विचारणा केली आहे.