उजनीचे पाणी हिप्परगा तलावात घेण्याचा प्रयोग यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 12:19 PM2019-10-17T12:19:37+5:302019-10-17T12:22:00+5:30
पाठपुराव्याचे यश; महापालिका आयुक्त, जलसंपदा अधीक्षकांनी बजावली महत्त्वाची भूमिका
राकेश कदम
सोलापूर : उजनीचे पाणी हिप्परगा तलावात घेण्याचा महापालिकेचा पहिलाच प्रयोग यशस्वी झाला आहे. तलावात अर्धा टीएमसीपेक्षा जास्त पाण्याचा साठा झाला आहे. किमान एक ते दीड महिना पाणी पुरेल, असा विश्वास पाणीपुरवठा अधिकारी व्यक्त करीत आहेत
उजनीचे पाणी हिप्परगा तलावात घेण्यासाठी कारंबा शाखा कालव्याची निर्मिती करण्यात आली आहे. या कालव्यातून पाणी उपसा करून तलावात सोडावा लागतो. मागील अनेक वर्षात याबाबत चर्चा झाली. जिल्हा नियोजन समितीने मागील वर्षी यासाठी निधीची तरतूद केली होती. पण प्रत्यक्षात काम झाले नव्हते. यंदा पुन्हा यासाठी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला. उजनी धरण भरेल अशी शक्यता निर्माण झाली. यापार्श्वभूमीवर उजनीचे पाणी हिप्परग्यात घेण्याची पुन्हा चर्चा सुरू झाली. महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी अधिकाºयांची बैठक बोलावली. अधीक्षक अभियंता धीरज साळे यांच्यासोबत बैठक घेतली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनीही वेळोवेळी समन्वय घडवून आणला.
कालव्यातून पाणी उपसा करण्यासाठी पंप हाऊसवर स्वतंत्र रोहित्र उभारणे गरजेचे होते. आयुक्त तावरे यांनी वीज वितरणचे अधीक्षक अभियंता गोपीचंद पडळकर यांच्यासोबत बैठक घेऊन या कामाला गती दिली. दोन दिवसांत रोहित्रासह वीज जोडण्याची कामे पूर्ण करण्यात आली. महापालिकेच्या कर्मचाºयांनी अहोरात्र परिश्रम करुन तातडीने दोन ठिकाणी पंप बसविले. तलावाच्या जॅकवेलमध्ये साचलेला बराच गाळ काढण्यात आला.
जलसंपदाकडील पाठपुरावा ठरला महत्त्वाचा
- जुलै महिन्यात कालव्याला पहिल्यांदा पाणी सोडले. दोनच दिवसांत पुन्हा बंद झाले. पुन्हा सप्टेंबर महिन्यात पाणी आले. मोहोळ तालुक्यात सय्यद वरवडे येथे कॅनॉल फुटल्याने पुन्हा पाणी बंद झाले. या कालव्याची दुरुस्ती करून पुन्हा पाणी सोडण्यात यावे यासाठी मनपा आयुक्त तावरे यांनी जलसंपदाकडे पाठपुरावा कायम ठेवला. जलसंपदाचे अधिकारी टाळाटाळ करीत होते. मनपाच्या पाठपुराव्यामुळे ४ आॅक्टोबर रोजी पुन्हा पाणी सोडण्यात आले. महापालिकेने पाणी उपसा करून तलावात पाणी घेतले. सध्या तलावात जवळपास अर्धा टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हा साठा दीड महिना पुरेल. कालव्यातून आणखी दहा दिवस पाणी सोडावे असे पत्र महापालिकेने जलसंपदा विभागाला दिल्याचे सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांनी सांगितले.
शहराला काय फायदा?
- हिप्परगा तलाव हा शहर पाणीपुरवठ्याच्या प्रमुख स्रोतांपैकी एक आहे. ब्रिटिश काळात या तलावाच्या काठावर आदर्शवत पाणीपुरवठा यंत्रणा उभारण्यात आली आहे. तलावाच्या जॅकवेलमधून गुरुत्वीय पद्धतीने भवानी पेठेतील पाणी गिरणीत पाणी पोहोचते. सध्या हिप्परगा तलावातील पाणी गिरणीत घेण्यात आले आहे. पाणी गिरणीतून तीन टाक्यांना पुरवठा होतो. पाणी गिरणीत पुरेसे पाणी आल्याने जुळे सोलापूर आणि पाकणी जलशुद्धीकरण केंद्रावरील ताण कमी झाला आहे. यामुळे शहरात तीन दिवसाआड पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.