प्रयोगशील नेत्याची हुरहूर लावणारी ‘एक्झिट’

By Admin | Published: June 4, 2014 12:37 AM2014-06-04T00:37:58+5:302014-06-04T00:37:58+5:30

भारतीय जनता पक्षाला महाराष्टÑात जनाधार मिळाला तो गोपीनाथ मुंडे यांच्या सोशल इंजिनिअरिंग प्रयोगामुळे.

Expiry of the Leader of the Opposition | प्रयोगशील नेत्याची हुरहूर लावणारी ‘एक्झिट’

प्रयोगशील नेत्याची हुरहूर लावणारी ‘एक्झिट’

googlenewsNext

सोलापूर: ‘शेठजी अन् भटजीं’चा पक्ष असे हिणवले गेलेला आणि तशीच काहीशी ओळख झालेल्या भारतीय जनता पक्षाला महाराष्टÑात जनाधार मिळाला तो गोपीनाथ मुंडे यांच्या सोशल इंजिनिअरिंग प्रयोगामुळे. ‘सोशल इंजिनिअरिंग’ हा शब्द मायावतींच्या उत्तर प्रदेशातील यशामुळे राजकारणात रूढ झाला असला तरी या कल्पनेवर पंधरा वर्षांपूर्वीच मुंडे यांनी यशस्वीपणे काम केले होते....राजकारणातील या प्रयोगशील नेत्याची आकस्मिक ‘एक्झिट’ सर्वांनाच हुरहूर लावून गेली. नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला एक सक्षम नेतृत्व मिळाले अन् आता ‘अच्छे दिन’ आले असे म्हणत असताना उजाडता मंगळवार ‘निहायत बुरा दिन’ घेऊन आला. भाजपला लोकसभा निवडणुकीत मिळालेले अभूतपूर्व यश म्हणजे काय चमत्कार होता का? मोदी म्हणतात, अनेक पिढ्या आणि कार्यकर्त्यांनी आपले जीवन वाहिले, तेव्हा हे यश मिळाले. महाराष्टÑात भाजपला जनाधार मिळवून देण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनीही आपले अवघे तारूण्य समर्पित केले. प्रमोद महाजनांच्या साथीने त्यांनी महाराष्टÑाच्या कानाकोपर्‍याशी संपर्क स्थापित केला. मुंडे जिथे जिथे जातील तिथे लोक जमा व्हायचे. त्यांची भूमिका जाणून घ्यायचे; पण निवडणुकांमध्ये जनाधार मिळायचा नाही. भाजपला ‘शेठजी आणि भटजी’ यांचा पक्ष म्हणूनच हिणवले जायचे. मुंडे यांनी भाजपची ही ओळख पुसायची असे ठरविले आणि सर्व जाती-धर्मातील कार्यकर्त्यांना भाजपमध्ये सामील करून त्यांना मानाचे स्थान देण्याचा धडाका लावला. महाराष्टÑाच्या राजकारणावर मराठा समाजाचा मोठा प्रभाव आहे. लोकप्रिय असलेले मराठा नेते भाजपमध्ये कसे सामील होतील यावर त्यांनी विचार केला अन् छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना राज्यमंत्रीपद दिले. अण्णा डांगे यांच्यामुळे भाजपचा धनगर समाजामध्ये पाया होता; पण मुंडे यांनी कवठे महांकाळ येथील प्रकाश शेंडगे यांच्या गळ्यात भाजपचे उपरणे घालून या समाजातील पक्षाचा पाया व्यापक केला. मुंडे यांच्या सोशल इंजिनिअरिंगची अशी राज्यात अनेक उदाहरणे आहेत. सोलापूर जिल्ह्यापुरते बोलायचे तर महाराष्टÑातील राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते - पाटील यांचे कनिष्ठ बंधू प्रतापसिंह मोहिते - पाटील यांना भाजपमध्ये आणले. त्यांना महाराष्टÑ सरकारमध्ये राज्यमंत्रीपद दिले. पश्चिम महाराष्टÑातील भाजपचा ‘बेस’ निर्माण करण्यासाठीचे हे महत्त्वाचे पाऊल होते; पुढे प्रतापसिंह भाजपचे खासदारही झाले. ‘लोकमंगल’ समूहाचे सुभाष देशमुख या मराठा नेत्याला सुरूवातीला मुंडे यांनीच बळ दिले. ते विधानपरिषदेवर निवडून आले. त्यानंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघात त्यांनी भाजपचा झेंडा फडकाविला. अगदी अलीकडे लोकसभा निवडणुकीत अ‍ॅड. शरद बनसोडे यांना भाजपची उमेदवारी घेण्यासाठी मुंडे यांनीच प्रोत्साहन दिले आणि तब्बल दहा वर्षांनंतर सोलापूरची जागा भाजपसाठी जिंकून घेतली. मुंडे यांच्या निधनाचे वृत्त समजताच अगदी सामान्य सोलापूरकरांच्याही काळजाचा ठोका चुकला. सर्व जाती-धर्मांना घेऊन जाणारा सर्वसमावेशक नेता हरपल्याबद्दल दु:ख व्यक्त झाले. भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर आले. चौकाचौकात मुंडेंची छायाचित्रे लावून गुलाबपुष्पांनी आदरांजली वाहण्यात आली.

-----------------------

प्रेमाचा अधिकार

गोपीनाथ मुंडे प्रत्येक कार्यकर्त्याशी अधिकाराने बोलत; पण तो अधिकार प्रेमाचा असे. दोन प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असल्यास ते दोघांनाही स्वतंत्रपणे भेटून प्रेमळ अधिकारवाणीने त्यांच्यात समेट घडवून आणत. खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे यांच्यावरही असाच मुंडे यांनी प्रेमाचा अधिकार गाजविला होता. अ‍ॅड. बनसोडे लोकसभेची निवडणूक लढायला तयार नव्हते. मुंडे यांच्या कानावर ही गोष्ट गेली तेव्हा त्यांनी अ‍ॅड. बनसोडे यांना बोलावून घेतले अन् सांगितले, ‘तू लोकसभा निवडणूक लढणार आहेस’. मुंडे यांच्या या प्रेमळ आग्रहामुळेच अ‍ॅड. बनसोडे यांनी निवडणूक लढविली.

 

Web Title: Expiry of the Leader of the Opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.