आश्चर्य व्यक्त; ऊस गाळपात सोलापूर राज्यात आघाडीवर; उताऱ्यात मात्र शेवटचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2021 07:34 PM2021-12-19T19:34:06+5:302021-12-19T19:34:12+5:30
अमरावती विभागही सोलापूरच्या पुढे
सोलापूर : ऊस गाळपात राज्यात आघाडीवर असलेला सोलापूर जिल्हा उताऱ्यात मात्र शेवटून दुसरा आहे. ऊस गाळप हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी सोलापूर जिल्ह्याचा साखर उतारा वाढत नसल्याने ऊस उत्पादकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे अमरावती विभागही साखर उताऱ्यात सोलापूरच्या पुढे आहे.
राज्यात ऊस गाळपाने आता चांगलाच वेग घेतला आहे. १८६ साखर कारखाने सुरू असून, यामध्ये सोलापूर विभागात सर्वाधिक ४३, कोल्हापूर विभागात ३५, पुणे विभागात २९, अहमदनगर व नांदेड विभागातील प्रत्येकी २६, नागपूर ३ व अमरावती विभागातील दोन साखर कारखान्यांचा यामध्ये समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील ३३ साखर कारखान्यांचे ६८ लाख मेट्रिक टन, तर कोल्हापूर जिल्ह्यातील २२ कारखान्यांचे ५८ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. अहमदनगरच्या २२ व पुणे जिल्ह्यातील १६ कारखान्यांचे ४२ लाख, सातारा व सांगली जिल्ह्यांतील प्रत्येकी १३ कारखान्यांचे ३० लाख व उस्मानाबाद जिल्ह्यातील ११ साखर कारखान्यांनी १७ लाख मेट्रिक टन गाळप केले आहे. राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ३३, तर मराठवाड्यात उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ११ साखर कारखान्यांचे गाळप सुरू असले तरी सोलापूर विभाग साखर उताऱ्यात शेवटून दुसरा आहे.
----------
कोल्हापूर विभागाचा साखर उतारा १०.७२ टक्के, पुणे विभागाचा ९.६९ टक्के, नांदेड विभागाचा ९.०७ टक्के, अहमदनगर विभागाचा ८.८६ टक्के, औरंगाबाद विभागाचा ८.६९ टक्के, अमरावती विभागाचा ८.२७ टक्के, सोलापूर विभागाचा ८.५ टक्के, तर नागपूर विभागाचा उतारा ७.४२ टक्के इतका आहे.