शैला गोडसे यांची शिवसेनेतून हकालपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:23 AM2021-04-01T04:23:05+5:302021-04-01T04:23:05+5:30
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून ही घोषणा केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई केल्याचे यामध्ये नमूद केले ...
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून ही घोषणा केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई केल्याचे यामध्ये नमूद केले आहे. शैला गोडसे यांनी मागील चार वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. कुरूल जिल्हा परिषद गटातून त्यांनी मिळविलेला विजय, त्यानंतर एक महिला म्हणून विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्यांची असलेली धडपड, वेळोवेळी केलेली आंदोलने याची दखल घेत शिवसेनेने त्यांना महिला आघाडीचे जिल्हाप्रमुखपद दिले होते.
यावेळी शिवसेना महाविकास आघाडीत असल्याने उमेदवारी मिळणार नाही, हे माहीत असूनही त्यांनी जनता हाच आपला पक्ष मानत निवडणुकीची जोरदार तयारी केली होती. निवडणुकीत अपक्ष अर्जही दाखल केला. मात्र, त्यानंतर पक्षाच्या नेत्यांनी तो काढून घ्यावा, यासाठी संपर्क साधूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. म्हणून पक्षाने त्यांना पक्षातून बाहेर काढत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पंढरपूर पोटनिवडणूक आता दुरंगी न होता शैला गोडसे, स्वाभिमानीचे सचिन शिंदे व अपक्षांमुळे बहुरंगी होण्याची चिन्हे आहेत.
निवडणूक लढविण्यावर ठाम
आपण शेतकरी, नागरिकांचे प्रश्न सोडवत असताना रस्ते, पाणी, वीज आदी समस्या आंदोलनाच्या बळावर सोडवून घेतल्या. त्यामुळे नागरिकांमधून आपण निवडणूक लढवावी, असा आग्रह होता. म्हणून, आपण उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावर ठाम आहोत. पक्षाच्या कारवाईविरोधात आपण काहीही बोलणार नाही. ३ तारखेला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी आपण पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देण्याची तयारी ठेवली होती, असे शैला गोडसे यांनी सांगितले.
----