अंगणवाड्यांना भरघोस निधी
By Admin | Published: June 10, 2014 12:56 AM2014-06-10T00:56:31+5:302014-06-10T00:56:31+5:30
सतरा कोटींची तरतूद : ४०० अंगणवाड्यांना मिळेल मंजुरी
सोलापूर : मागील वर्षीची अखर्चित व यावर्षी जिल्हा नियोजन मंडळाकडून १६ कोटी ७५ लाख रुपये आमच्याकडे असून, यातून सुमारे ४०० अंगणवाड्यांच्या इमारतींच्या बांधकामाला मंजुरी दिली जात असल्याचे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभापती जयमाला गायकवाड यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील सुमारे १२४४ अंगणवाड्यांसाठी इमारती नाहीत. उघड्यावर, मंदिरात, जि.प. शाळेत व खासगी जागेत या अंगणवाड्या भरविल्या जात आहेत. मागील वर्षी एका अंगणवाडी इमारतीच्या बांधकामासाठी साडेचार लाख रुपये दिले जात होते. परंतु एवढ्या रकमेतून इमारत बांधकाम होत नव्हते. रक्कम अपुरी पडत असल्याने अनेक अंगणवाड्यांची कामे सुरुच होऊ शकली नाहीत. त्यामुळे मागील वर्षीची दोन कोटी २५ लाख इतकी रक्कम अखर्चित राहिली होती. यावर्षी जिल्हा नियोजन मंडळाने १४ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. ही रक्कम अंगणवाड्या इमारतींची बांधकामे करण्यासाठी खर्च करावयाची आहे. यातून सुमारे ४०० अंगणवाडी इमारतींच्या बांधकामांना मंजुरी दिली जात असल्याचे सभापती जयमाला गायकवाड यांनी सांगितले.
जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारती नाहीत. बहुतांश अंगणवाड्या भाड्याच्या जागेत भरतात. आता या अंगणवाड्यांना जिल्हा नियोजन मंडळाकडून भरघोस निधी मिळाल्याने या अंगणवाड्यांच्या इमारती उभ्या करण्यास मोठी मदत होणार आहे. सध्या पंचायत समितीकडून अंगणवाडीच्या जागांसाठी कागदपत्र मागणी केली जात आहेत. कागदपत्र आलेल्यांना लागलीच मंजुरी दिली जाणार असल्याचे सभापती जयमाला गायकवाड यांनी सांगितले.
----------------------------
पुन्हा आचारसंहिता...
४सध्या जिल्हा परिषद विकासकामांबाबत कडक अंमलबजावणी करीत आहे. आचारसंहिता संपल्यानंतर अंगणवाड्यांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळेल परंतु या कामाचे ई-टेंडर निघणार आहे. ही प्रक्रिया काहीकेल्या विधानसभा निवडणुकीअगोदर होईलच असे सांगता येणार नाही. त्यामुळे अंगणवाड्यांची कामे कधी सुरू होणार व पूर्ण कधी होणार हा प्रश्न आहे.
----------------------
शासनाने अंगणवाडी इमारतीसाठी आता सहा लाख रुपये इतकी रक्कम केली आहे. मागील वर्षीपेक्षा दीड लाखाने रक्कम वाढविल्याने अंगणवाड्यांची कामे होतील. जागेचा उतारा व कागदपत्रे सादर करावीत.
- जयमाला गायकवाड
सभापती, बालकल्याण जि.प.