फेसबूकद्वारे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून १८ लाखाला गंडा
By विलास जळकोटकर | Updated: March 16, 2024 19:10 IST2024-03-16T19:10:19+5:302024-03-16T19:10:26+5:30
ऑनलाईन व्यवहार करताना कोणत्याची प्रकारच्या फसव्या लिंकना बळी पडू नये याबद्दल वारंवार आवाहन करण्यात येऊनही असे प्रकार घडतात.

फेसबूकद्वारे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून १८ लाखाला गंडा
सोलापूर: फेसबूकद्वारे stock frontine- G13 हा शेअर मार्केट ट्रेडिंग व्हॉटस्अप ग्रूप तयार करुन त्याद्वारे वेगवेगळ्या लिंकद्वारे पैसे भरायला लावून १७ लाख ८५ हजार रुपयांला गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गोपाल दत्तात्रय मिठ्ठा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शु्क्रवारी सायबर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीसह आयटी ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदला आहे. हा प्रकार १ ते १५ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत घडला. अनिल मिश्रा, आशिष शहा अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी आपले फेसबूक अकाऊंट पाहत असताना १ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११ च्या सुमारास त्यांना फेसबूकवर नमूद आरोपींनी stock frontine- G13 हा शेअर मार्केट ट्रेडिंग व्हॉटस्अप ग्रूप तयार करुन त्यामध्ये वेगवेगळे मोबाईल क्रमांक ॲड केले. त्याद्वारे फिर्यादीला शेअर मार्केट व्यवसाय करण्यासाठी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यांच्या मोबाईलवर https:/app.chc- sesb.com/mine ही लिंक पाठवली.
फिर्यादीला प्रायमरी अकाऊंट ओपन करण्यास सांगितले. त्यांच्याकडून वेगवेगळ्या खात्यावर रक्कम जमा करुन घेतली. कंपनीच्या चार्टमध्ये फिर्यादीने खरेदी केलेल्या शेअर्स व आयपीओच्या किंमती वाढल्याचे प्रकाशीत केले. त्यातील कोणतेही प्राफिट फिर्यादीला मिळू दिले नाही. फिर्यादीने कंपनीकडे १७ लाख ८५ हजार एवढी मूळ रक्कम जमा केलेली असताना त्याचा कोणत्याची प्रकारचा परतावा मिळाला नाही. आपली फसवणक झाल्याचे लक्षात आल्याने फिर्यादीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
फसगत टाळण्यासाठी आवाहन
ऑनलाईन व्यवहार करताना कोणत्याची प्रकारच्या फसव्या लिंकना बळी पडू नये याबद्दल वारंवार आवाहन करण्यात येऊनही असे प्रकार घडतात. आपली फसगत होऊ नये यासाठी सतर्क राहावे, असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी केले आहे.