अतिरिक्त ठरलेल्या गुरुजींचे होणार झेडपीच्या शाळांमध्ये समायोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:40 PM2018-12-13T12:40:25+5:302018-12-13T12:41:19+5:30
सोलापूर: जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळांमधून अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समावेशनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. उद्या गुरुवारी सकाळी ११ वाजता या ...
सोलापूर: जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळांमधून अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समावेशनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. उद्या गुरुवारी सकाळी ११ वाजता या शिक्षकांची झेडपीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक होणार असून, येथे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना ठरलेल्या शाळांवर नियुक्ती होणार आहे.
याप्रसंगी झेडपीचे मुख्य कार्यकारी डॉ. राजेंद्र भारुड, माध्यमिक शिक्षणाधिकारी रमेश जोशी, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, डायटच्या प्राचार्या ज्योती मेटे यांची उपस्थिती राहणार आहे. यांच्या उपस्थितीत शिक्षकांना समुपदेशनानंतर समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील खासगी शाळांमध्ये सन २०१६-१७ व १७-१८ मध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा प्रश्न प्रलंबित राहिला होता. झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सूचनेनुसार शिक्षण विभाग अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा प्रश्न निकाली काढण्यात येत आहे. २०१६-१७ च्या सेवक संचानुसार १३४ शिक्षक अतिरिक्त कक्षेत आले होते. त्यातील १०३ शिक्षकांचा प्रश्न यापूर्वीच मार्गी लागले आहेत. उर्वरित ३७ शिक्षकांचा प्रश्न दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. झेडपीकडे मराठी माध्यमासाठी २५, कन्नडसाठी २५ आणि उर्दू विभागासाठी ७ अशा ३७ जागा रिक्त आहेत. या शिक्षकांना शिक्षण विभाग समाविष्ट करून घेणार असल्याचे सांगण्यात आले.
सन २०१७-१८ साठी ६० पदे रिक्त आहेत. यामध्ये मराठी माध्यमासाठी ३९, कन्नड १५ आणि उर्दू माध्यमासाठी ६ अशा ६० जागांवर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची वर्णी लावण्यात येणार आहे. याशिवाय याच वर्षातील बिगर अल्पसंख्याक विभागात मराठी माध्यमासाठी २२ पदे तर अल्पसंख्याक विभागामध्ये १७ पदे रिक्त ठरली आहेत. या सर्वांचे सेवाज्येष्ठतेनुसार समायोजन करून घेण्यात येणार आहे. उर्वरित रिक्त पदांची टप्प्याटप्प्याने जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेकडे समाजयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
याप्रसंगी झेडपीचे मुख्य कार्यकारी डॉ. राजेंद्र भारुड, माध्यमिक शिक्षणाधिकारी रमेश जोशी, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, डायटच्या प्राचार्या ज्योती मेटे यांची उपस्थिती राहणार आहे. यांच्या उपस्थितीत शिक्षकांना समुपदेशनानंतर समाविष्ट करून घेण्यात येणार आहे.
शिक्षकांच्या समायोजनेसंबंधी यापूर्वीच सर्वांच्या हरकती घेऊन त्यावर सुनावणी घेण्यात आली आहे. त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात आलेले आहे. आता अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समुदेशन करुन त्यांना नियमानुसार समायोजन करुन घेण्यात येईल.
- संजयकुमार राठोड, शिक्षणाधिकारी, प्राथमिक