उर्दू भाषेमध्ये खूप मोठी ताकद, अनिस चिश्ती यांचे मत, उर्दू संमेलन जीवनगौरव पुरस्काराचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 04:23 PM2018-02-16T16:23:32+5:302018-02-16T16:27:07+5:30
देशात १६५२ भाषा बोलल्या जातात़ उर्दू ही एक त्यापैकी एक आहे़ देशाच्या अर्थसंकल्पाची सुरुवात ही उर्दूने केली जाते़ जगात अनेक ठिकाणचा कारभार हा उर्दूत चालतो़ इतक्या मोठ्या प्रमाणात भाषा देशात बोलल्या जात असल्या तरी उर्दू वा अन्य कोणत्याही भाषेबद्दल येथे तिरस्कार मात्र कोणी करताना दिसत नाही़
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १६ : देशात १६५२ भाषा बोलल्या जातात़ उर्दू ही एक त्यापैकी एक आहे़ देशाच्या अर्थसंकल्पाची सुरुवात ही उर्दूने केली जाते़ जगात अनेक ठिकाणचा कारभार हा उर्दूत चालतो़ इतक्या मोठ्या प्रमाणात भाषा देशात बोलल्या जात असल्या तरी उर्दू वा अन्य कोणत्याही भाषेबद्दल येथे तिरस्कार मात्र कोणी करताना दिसत नाही़ इतकी मोठी ताकद उर्दूमध्ये असल्याचे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ, लेखक डॉ़ अनिस चिश्ती यांनी केले़
अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलनाच्या वतीने उर्दू दिनानिमित्त गिरीश चौधरी यांना उर्दू मित्र पुरस्कार तर सय्यद इक्बाल यांना जीवनगौरव पुरस्कार चिश्ती यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले़ या प्रसंगी बोलताना त्यांनी वरील प्रतिपादन केले़ गुरुवारी सायंकाळी डॉ़ निर्मलकुमार फडकुले सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमास पोलीस आयुक्त महादेव तांबडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते़ यावेळी अ़ भा़ उर्दू साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अॅड़ यू़ एऩ बेरिया, सचिव अखलाख अहेमद शेख, उपसचिव अश्पाक सातखेड, उपाध्यक्ष अब्दुल क य्युम, अब्दुल जब्बार शेख यांची प्रमुख उपस्थिती होती़ रियाज वळसंगकर यांनी प्रास्ताविकेतून उर्दू कॉन्फरन्सचा इतिहास थोडक्यात मांडला़ प्रारंभी महाराष्ट्र उर्दू साहित्य पुरस्कार देऊन गौरविल्याबद्दल सोशल प्राथमिक उर्दू प्रशालेचे मुख्याध्यापक आसिफ इक्बाल आणि एजाज शेख यांचा विशेष सत्कार करण्यात आला़
यावेळी अनिस चिश्ती यांनी माजी मुख्यमंत्री कै़ शंकरराव चव्हाण यांचे उच्च शिक्षण उर्दूमधून झाल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली़ उर्दूतील प्रत्येक शब्द हा वजनदार आहे़ तो जपून वापरायला हवा़ या देशात खरोखरच उर्दू भाषेला प्रोत्साहन दिले जात असल्याचेही ते म्हणाले़
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्पाक सातखेड यांनी केले तर आभार अखलाख शेख यांनी मानले़ यावेळी विकार शेख, डॉ़ गुलाम दस्तगीर, नासर आळंदकर, डॉ़ इक्बाल तांबोळी, प्रा़ शफी चोपदार, मुमताज शेख, अय्युब नल्लामद्दू आदी उपस्थित होते़
-----------------------
उर्दू ही सर्वांचीच भाषा : तांबडे
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना उर्दू ही एका जमातीची भाषा असल्याचा अनेकांचा गैरसमज आहे़ ही भाषा सर्वांचीच असल्याचे पोलीस आयुक्त महादेव तांबडे म्हणाले़ महाराष्ट्रातील मराठी माणूस जरी उर्दू बोलू, लिहू शकत नसला तरी ती समजू शकतो हेच मोठे वैैशिष्ट्य या भाषेचे मानले पाहिजे़ उर्दू समजून घ्या, जाणून घ्या आणि शिकूनही घ्या, असेही ते म्हणाले़