फेसबुकवरील मैत्रीचा शेवट झाला पोलीस ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 03:37 PM2019-06-17T15:37:02+5:302019-06-17T15:40:37+5:30
लंडनच्या मित्राने घातला नऊ लाख ६८ हजारांचा गंडा; सोलापुरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सोलापूर : फेसबुकवर मैत्री झाली, व्हॉट्सअॅपवर चॅटींग झाले आणि गिफ्ट पाठवतो म्हणून नऊ लाख ६८ हजारांच्या फसवणुकीनंतर त्याचा शेवट पोलीस ठाण्यात झाला. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वैशाली लक्ष्मण शिंदे (वय ३७, रा. पत्रकार नगर, यशोधन बंगला, सिव्हिल हॉस्पिटल) या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत. वैशाली शिंदे यांच्या फेसबुकवर ७ मे २0१९ रोजी अॅलेक्झांडर स्टिव्ह यु.के. लंडन या व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, ती त्यांनी स्वीकारली. लंडनच्या व्यक्तीने शिंदे यांचा व्हॉट्सअॅप नंबर मागितला. व्हॉट्सअॅपवर त्याने एक गिफ्ट पाठवित आहे, असा मेसेज दिला. वैशाली शिंदे यांनी गिफ्टला नकार दिला; मात्र ११ मे २0१९ रोजी अॅलेक्झांडर स्टिव्ह याने फोन करून तुझ्या पत्त्यावर गिफ्ट पाठवले आहे असे सांगितले.
१३ मे २0१९ रोजी वैशाली शिंदे यांना फोन आला व बोलणाºया व्यक्तीने मी दिल्ली एअरपोर्टवरून बोलतो आहे. तुमचे गिफ्ट दिल्ली एअरपोर्टवर आले आहे, ते घेण्यासाठी ३५,००० रुपये ट्रान्स्पोर्ट चार्ज भरावे लागेल असे सांगितले. वैशाली शिंदे यांनी १३ मे २0१९ रोजी विजया बँकेच्या खात्यावर पैसे भरले. त्याच दिवशी पुन्हा फोन आला आणि सांगण्यात आले की तुमचे गिफ्ट फोडण्यात आले असून, त्यामध्ये ६० हजार पाँड एवढी रक्कम आहे. ते काढण्यासाठी आणखी ८७ हजार रुपये सांगितले यावर विश्वास ठेवून वैशाली शिंदे यांनी १४ मे रोजी पुन्हा कोटक बँकेच्या खात्यावर पैसे भरले. पैसे भरल्यानंतर पुन्हा फोन आला व तुमच्या ई-मेल आयडीवर आरबीआयकडून मेल आला आहे, तो चेक करून त्यातील फॉर्म भरा व आम्हाला परत पाठवा असे सांगण्यात आले.
पुन्हा ५ लाख ५१ हजार रुपये युनायटेड नेशन अॅन्टी टेरेरिस्ट डिपार्टमेंटची आहे. ती तुम्हाला भरावी लागेल असे सांगितले. २९ मे २०१९ रोजी एक लाख ९१ हजार रुपये भरा अन्यथा तुमच्यावर अॅन्टी ड्रग अॅन्ड टेरेरिस्ट डिपार्टमेंट भारत सरकारला कळवेल आणि तुमच्यावर कारवाई होईल अशी धमकी दिली. भीतीपोटी त्यांनी तीही रक्कम भरली. शेवटी पुन्हा सोळा लाख ५0 हजार रुपये भरण्याची मागणी केली तेव्हा वैशाली शिंदे यांनी याबाबत मित्रांकडे चौकशी केली असता हा सर्व फसवणुकीचा प्रकार असल्याचे सांगण्यात आले. तपास पोलीस निरीक्षक बहिरट करीत आहेत.
विश्वास बसेल असा ई-मेल पाठवला...
- वैशाली शिंदे यांना प्रत्येकवेळी काही ना काही कारण सांगून पैसे भरण्यास सांगितले जात होते. २ ते ३ वेळा आरबीआयचा मेल आला असेल तो पाहा आणि फॉर्म भरा असे सांगितले जात होते. वैशाली ज्यावेळी मेल पाहत होत्या तेव्हा तो हुबेहूब भारत सरकारच्या आरबीआयचा (भारतीय रिझर्व्ह बँकेचा) वाटत होता. ६0 हजार पाँड मिळण्याच्या आशेपोटी आणि शासनाकडून होणाºया कारवाईच्या भीतीपोटी वैशाली शिंदे या रक्कम भरत गेल्या.