होम मैदानावर चार मोबाइल टॉयलेटची सुविधा; धूळ कमी करण्यासाठी तासाला पाण्याचा सडा
By Appasaheb.patil | Published: January 12, 2023 03:22 PM2023-01-12T15:22:05+5:302023-01-12T15:23:16+5:30
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा; महापालिकेची यंत्रणा लागली कामाला
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : होम मैदान परिसरात चार मोबाइल टॉयलेटची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, तसेच या ठिकाणी नियमितपणे स्वच्छताही राखण्यात येणार आहे. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक ती दक्षता व खबरदारी घेण्यात येत आहे. धूळ कमी करण्यासाठी मैदानावर सातत्याने पाणी मारण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी दिली.
ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेस योगदंडाची विधिवत पूजन करून भक्तीभावात प्रारंभ झाला आहे. गुरुवारी १२ जानेवारी रोजी तैलाभिषेक व ६८ लिंग प्रदक्षिणा, नंदीध्वज मिरवणूक निघणार आहे. दरम्यान, तत्पूर्वी सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीने श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर, होम मैदान तसेच नंदीध्वज मिरवणूक मार्गावर रस्त्याची कामे, खड्डे बुजवणे, स्वच्छता त्याचबरोबर मिरवणूक मार्गावर अडथळा ठरणाऱ्या झाडांची फांदी काढणे आदी सर्व कामे नेटक्या पद्धतीने करण्यात आली आहेत. नंदीध्वज मिरवणूक मार्ग सर्व सोयी- सुविधांनी उपलब्ध करण्यात आला आहे. मिरवणूक मार्गावर अडथळा दूर करण्यासाठी महापालिकेकडून एक गाडीही सोबत ठेवण्यात येणार आहे.
स्वच्छतेसाठी ज्यादा कर्मचारी...
सिद्धेश्वर यात्रेत प्रामुख्याने स्वच्छतेवर अधिक भर देण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. दरम्यान, स्वच्छतेसाठी अधिकचा कर्मचारी वर्गही या काळात तैनात करण्यात येणार आहे. होम मैदान, मंदिर परिसर, ६८ लिंग परिसरात स्वच्छता पुरविण्यासाठी अधिकारी व कर्मचारी काम करणार आहेत.
स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती
सिद्धेश्वर यात्रा काळात सोलापूर शहर- जिल्ह्यासह देशभरातून लाखो भाविक या ठिकाणी येतात. तेव्हा महापालिकेच्या वतीने ओला- सुका कचरा वर्गीकरण व स्वच्छता राखण्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी विविध ठिकाणी डिजिटल फलक लावण्यात येणार आहेत. ‘स्वच्छ व सुंदर सोलापूर’साठी नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी हे फलक लावण्यात येणार असल्याचे महापालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"