तपासणी अन् लसीकरणाची सोय दुपट्टीनं वाढवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:21 AM2021-04-06T04:21:32+5:302021-04-06T04:21:32+5:30
प्रशासनाने अक्कलकोट शहरात एक ठिकाणी तर तालुक्यात आठ ठिकाणी तपासणी व लस देण्याचे सुविधा उपलब्ध केली होती. ५ एप्रिलपासून ...
प्रशासनाने अक्कलकोट शहरात एक ठिकाणी तर तालुक्यात आठ ठिकाणी तपासणी व लस देण्याचे सुविधा उपलब्ध केली होती. ५ एप्रिलपासून ग्रामीणमध्ये २३ ठिकाणी ह सोय केली आहे. यामुळे ग्रामीण जनतेला सोयीचे झाले आहे. मात्र प्रशासनाने पूर्वीप्रमाणे कोणत्याही प्रकारची सक्ती केली जात नाही. प्रशासन कमी पडताना दिसत आहे. अक्कलकोट येथे कोविड केअर सेंटर असून, येथे सध्या २२ रुग्ण उपचार घेत आहेत. २५ मार्चपासून आतापर्यंत १ हजार २४१ रॅपिड चाचण्या झाल्यात त्यात ३४ जण पॉझिटिव्ह आढळले. ८१८ जणांची आरटीपीसीआर तपासणी झाली त्यात चार जण पॉझिटिव्ह आढळून आले तर एकाचा मृत्यू झाला आहे.
सध्या ४५ वर्षांवरील सरसकट लोकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. यासाठी यंत्रणेच्या तुलनेत फारच कमी प्रतिसाद मिळत आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कातील लोकांना यापूर्वी सक्तीने अलगीकरण कक्षात ठेवले जात असे. आता स्वेच्छाचे सवलत दिली गेल्याने फारसा प्रतिसाद मिळत नाही. यासासाठी युद्धपातळीवर ठोस उपाययोजना हव्यात, अशीही मागणी होत आहे.
२४ ठिकाणी तपासणी अन् लसीकरण
गेल्या वर्षापासून अक्कलकोट शहरासाठी ग्रामीण रुग्णालयात लसीकरण व अँटिजेन व आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. ग्रामीण जनतेच्या सोयीसाठी चपळगाव, शिरवळ, वागदरी, मैंदर्गी, दुधनी, करजगी, नागणसूर, जेऊर अशा आठ प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या काही दिवसांपासून टेस्ट व लसीकरण सुरू आहेत. आता या आरोग्य केंद्रांतर्गत १५ उपकेंद्रांतही सोय केली आहे. सध्या २४ ठिकाणी तालुक्यात तपासणी, लसीकरण सुविधा सुरू आहे.
---
कंटेन्मेंट झोन लावले अन् काढले
एकाच दिवशी एकाच कुटुंबातून १२ जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कंटेन्मेंट झोन म्हणून अक्कलकोट जवळील समर्थनगरचे नाव आले होते. सोमवारी सकाळी बांबू मारून रस्ता बंद केला होता. ग्रामस्थांनी या कुटुंबाच्या आधार कार्डवर पत्ता येथील असले तरी हल्ली ते सोलापूर येथे वास्तव्यास असल्याचे निदर्शनास आणून देताच ते काढून टाकले.
----
अक्कलकोट तालुक्यात लसीकरण व तपासणी केंद्र दुपटीने वाढवली आहे. नागरिकांनी स्वःताहून जवळील केंद्रावर तपासणीसाठी पुढे यावे. ४५ वर्षांवरील लोकांना लस देणे सुरू आहे. कोणताही आजार तत्काळ निदर्शनास आल्यास वेळेवर उपचार होऊन रुग्ण लवकर बरा होऊ शकतो.
- डॉ. अश्विन करजखेडे, तालुका आरोग्य अधिकारी
----