भीतीपेक्षाही श्रद्धा ठरली मोठी; अणूरेणियां थोकडा...भक्तिभाव आकाशाएवढा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 11:40 AM2020-07-01T11:40:46+5:302020-07-01T11:44:20+5:30
आषाढी एकादशी; यंदाची वारी...माऊली घरच्या घरी...
मोहन डावरे
पंढरपूर : भारताच्या कानाकोपºयातून आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या लाखो वैष्णवांना यंदा कोरोना संकटानं आपल्या घरी बसून पांडुरंगाबद्दलचा भक्तिभाव आळवावा लागत आहे. आषाढी सोहळ्याच्या निमित्ताने शासनाच्या नियमाधीन राहून यंदा संत ज्ञानेश्वर माऊली सोहळा, संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालख्यांसह अन्य मानाच्या पालख्या मोठ्या भक्तिभावाने बसमधून पंढरीसमीपच्या वाखरी येथे काहीकाळ विसावल्या. येथे टाळ-मृदंगाचा गजर होऊन पुन्हा बसनेच पंढरीत दाखल झाल्या. या निमित्ताने कोरोनाच्या भीतीपेक्षा श्रद्धा मोठी ठरली याचा प्रत्यय आला.
कोरोना संकटामुळे दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरा होणारा आषाढी सोहळा केवळ मानाच्या पालख्यांना पंढरीत प्रवेश देऊन साजरा करावा, असे निर्देश शासनाने दिले. त्यानुसार पायी वारीची परंपराही यंदा खंडित झाली. संत ज्ञानेश्वरमहाराज, संत तुकाराम महाराज, संत मुक्ताई महाराज, संत एकनाथ महाराज, संत निळोबाराय यासह मानाच्या १० पालख्या मंगळवारी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून वाखरी तळावर आल्या. प्रत्येक पालख्यातील पादुकांसमवेत २० मानाचे वारकरी होते. सोबत महसूल, पोलीस, आरोग्य अधिकाºयांचे पथक, अधिकारी आणि ५०० पोलिसांचा फौजफाटा तैनात केला होता.
बसमधून उतरल्यानंतर मानाच्या पालख्यांसमवेत असलेल्या भाविकांची आरोग्य विभागाच्या पथकाने थर्मल स्क्रीनिंग केले. शिवाय वाखरी तळावरील सर्व परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला.
प्रत्येक पालख्यांना काही काळ विसाव्यासाठी लहान मंडपाची उभारणी करण्यात आली होती. यावेळी पंढरपूर नगरपालिका, पंचायत समितीच्या अधिकाºयांसमवेत आरती करुन भक्तिभावाने सर्व पालख्यांचे स्वागत करण्यात आले. पादुकांचे मनोभावे दर्शन घेण्यात आले.