सोलापूरातील बनावट नोटातील सूत्रधाराचे तेलगीशी होते कनेक्ट, गुन्हे शाखेची माहिती, १९९२ साली त्या दोघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 05:08 PM2018-02-01T17:08:20+5:302018-02-01T17:10:13+5:30
तिप्पट नोटा देण्याचे आमिष दाखवून बनावट नोटा खºया म्हणून व्यवहारात आणून गंडवणारा आरोपी जियाउद्दीन दुरुगकर याचे बनावट स्टॅम्प घोटाळ्यातील आरोपी मयत अब्दुल करीम तेलगी याच्याशी संबंध होते.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १ : तिप्पट नोटा देण्याचे आमिष दाखवून बनावट नोटा खºया म्हणून व्यवहारात आणून गंडवणारा आरोपी जियाउद्दीन दुरुगकर याचे बनावट स्टॅम्प घोटाळ्यातील आरोपी मयत अब्दुल करीम तेलगी याच्याशी संबंध होते. या दोघांविरुद्ध सोलापुरात जेलरोड पोलीस ठाण्यात १९९२ साली फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता, अशी माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी दिली.
शहरातील शुक्रवार पेठेतील जामा मशिदीच्यामागे जियाउद्दीन दुरुगकर नावाची व्यक्ती एका खोलीमध्ये कलर प्रिंटरच्या मदतीने चलनी नोटांची झेरॉक्स प्रिंट काढून त्या बनावट नोटा व्यवहारात आणणार असल्याची माहिती २३ जानेवारी रोजी शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मध्यरात्री दुरुगकर याच्या खोलीवर छापा मारला. त्यावेळी खोलीमध्ये प्रिंटरवर प्रिंट काढत असताना दुरुगकर मिळून आला होता. यावेळी खोलीची झडती घेतली असता खोलीत जवळपास १८ लाख रुपयांच्या बनावट नोटा बनविण्याचे साहित्य आढळून आले होते. त्यानंतर पोलिसांनी दुरुगकर यास अटक केली.
आरोपी जियाउद्दीन दुरुगकर हा गेल्या १० वर्षांपासून बनावट नोटा तयार करायचा. त्या व्यवहारात आणण्यासाठी गिºहाईक शोधण्यासाठी वेगवेगळ्या लोकांना कामाला लावायचा. त्यासाठी तो संबंधितांना ४० टक्के रक्कम द्यायचा. संबंधित माणसे गिºहाईक शोधून त्याच्याशी डील करायचे. त्याची इत्थंभूत माहिती काढायचे आणि मगच दुरुगकर त्यांच्यासमोर जायचा आणि त्यांनी दिलेल्या खºया नोटांच्या बदल्यात तिप्पट नोटा द्यायचा. या काळात त्याचे साथीदार पैशांची देवाण-घेवाण करताना पोलीस आल्याचा आरडाओरडा करून पलायन करायचे. आतापर्यंत त्याने अनेकांना २ लाखांपासून १० लाखांपर्यंत गंडवल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
१९९२ साली सोलापुरातील चौघांना घेऊन दुरुगकर हा मुंबईतील एका हॉटेलमध्ये तेलगीशी भेटला. त्या चौघांना तेलगी सौदी अरेबियामध्ये जाण्यासाठी पासपोर्ट काढून देतो, असे सांगून त्या चौघांकडून पैसे घेतले. पण त्यांना पासपोर्ट काही काढून दिले नाही. अशी माहिती त्यावेळी फिर्यादींनी पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी जियाउद्दीन दुरुगकर आणि अब्दुल करीम तेलगी या दोघांविरुद्ध ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
---------------------
आरोपी जियाउद्दीन दुरुगकर याच्याकडून फोन लिस्ट मिळाली आहे, त्या फोन नंबरची लिस्ट सायबर सेलकडे दिली आहे. त्याच्याकडून नावे निष्पन्न होताच पुढील कारवाई करण्यात येणार आहे. त्याची पोलीस कोठडी संपली असून तो न्यायालयीन कोठडीत आहे.
- नागनाथ आयलाने
सहायक पोलीस निरीक्षक