कारमधून दीड लाखाचा बनावट दारू साठा जप्त; सोलापूर 'एक्साइज'ची बार्शी तालुक्यात कारवाई
By Appasaheb.patil | Published: September 26, 2022 03:07 PM2022-09-26T15:07:53+5:302022-09-26T15:08:01+5:30
लोकमत न्युज नेटवर्क
सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने २५ सप्टेंबर रोजी बार्शी तालुक्यात उपळेदुमाला या गावी एका कारमधून टॅंगो पंच ब्रॅंडच्या बनावट देशी दारुच्या ३२ पेट्या जप्त केल्या असून कारवाईत वाहनासह पाच लाख १२ हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक सदानंद मस्करे यांना अवैध दारूच्या वाहतुकीबाबत मिळालेल्या खात्रीलायक बातमी नुसार त्यांनी २५ सप्टेंबर रविवार रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास बार्शी-तुळजापूर रोडवरील उपळेदुमाला या गावाच्या हद्दीत सापळा रचला असता त्यांना एक स्विफ्ट डिझायर वाहन क्रमांक एमएच १२ एनयू २७५२ ही गाडी संशयितरीत्या वेगाने जात असल्याचे दिसून आले. सदर वाहनाचा पाठलाग करून वाहनास थांबवले असता त्या वाहनात दोन इसम आढळून आले. अंधाराचा फायदा घेऊन दोन्ही इसमांनी घटनास्थळावरून पळ काढला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाहनाची झडती घेतली असता वाहनात देशी दारू टॅंगो पंच ९० मिली क्षमतेच्या ३२ पेट्या बनावट दारूचा साठा आढळून आला. जप्त केलेल्या दारूची किंमत १ लाख १२ हजार इतकी असून वाहनासह एकूण ५ लाख १२ हजार किंमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हस्तगत करण्यात आलेला आहे. दोन्ही फरार आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. ही कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ब विभाग सदानंद मस्करे, जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट, प्रशांत इंगोले व वाहनचालक रशीद शेख यांच्या पथकाने केली आहे.
-----------
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आवाहन
या विभागाकडून अवैध दारु निर्मिती, विक्री व वाहतुकीविरुद्ध कारवाईकरिता ६ पथके नेमण्यात आली असून कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारू/ ताडी निर्मिती /वाहतूक /विक्री /साठा, बनावट दारू, परराज्यातील दारू याबाबत माहिती मिळाल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा, माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांनी केले आहे.